पिण्याचे पाणी बांधकामाला वापरण्यास अटकाव: रोष कमी करण्यासाठी महापालिकेकडून उपाययोजना

   


भाजप आंदोलनानंतर शिवसेनेचे शिष्टमंडळ आयुक्तांच्या भेटीला

औरंगाबाद : शहरातील पाणीटंचाईबाबत रोष कृत्रिमरीत्या तयार केला जात आहे काय, अशी शंका घेत शिवसेनेच्या शिष्टमंडळाने महापालिका आयुक्तांची भेट घेतल्यानंतर त्यांनी पाणीपुरवठा सुधारण्यासाठी ३२ मुद्दय़ांवर आधारित उपाययोजना केली जात असल्याचे शिष्टमंडळाला सांगितले. गेल्या चार वर्षांत पाणी उपसा आणि पाणी वितरणात काहीही बदल झालेले नाहीत. उन्हाळय़ामुळे काही ठिकाणी जाणवणाऱ्या पाणीटंचाईवर उपाययोजना करता याव्यात म्हणून पिण्याचे पाणी बांधकामाला वापरता येणार नाही यावर महापालिका नियंत्रण करेल, असे महापालिका आयुक्त अस्तिककुमार पांडेय यांनी सांगितले.

पाणीपुरवठा योजनेचे प्रधान सचिव संजीव जैस्वाल, विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनीही पाणीपुरवठाबाबतच्या बैठका घेतल्या असून पालकमंत्र्यांनीही याप्रकरणी लक्ष घातले होते. हर्सूल तलावातून पाच दशलक्ष लिटर दररोज पाणी घेतले जात होते. आता त्यात वाढ करून १० दशलक्ष लिटर पाणी घेण्याचे नियोजन केले गेले आहे. येत्या १० दिवसांत त्यासाठी जलवाहिनी टाकण्यात येणार आहे.

महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाकडून एक दशलक्ष लिटर पाणी घेतले जात होते. त्यात वाढ केली जाणार असून ते तीन दशलक्ष लिटर प्रतिदिन एवढी वाढ होईल. हे पाणी टँकरसाठी दिले जाणार आहे.

दरम्यान, शहरातील जलशुद्धीकरण केंद्रातून वापरण्याचे पाणी बांधकामासाठी दिले जाऊ शकेल. पिण्याचे पाणी बांधकामाला वापरण्यास मज्जाव केला जाईल, असेही आयुक्त अस्तिककुमार पांडे म्हणाले. शिवसेनेच्या शिष्टमंडळाने पाणीपुरवठा योजनेत कोणते बदल केले जावेत, याबाबतच्या सूचना केल्या.

या शिष्टमंडळात अंबादास दानवे, नंदकुमार घोडेले, राजू वैद्य, बाळासाहेब थोरात, किशनचंद तनवाणी यांच्यासह माजी महापौर त्र्यंबक तुपे यांचा सहभाग होता.अपुऱ्या पाणीपुरवठय़ामुळे निर्माण झालेला रोष नागरिक व्यक्त करत असल्याने शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी अलीकडेच महापालिका आयुक्त अस्तिककुमार पांडे यांना कामचुकार ठरवले होते. त्यांची बदली करू, असेही ते म्हणाले होते. या पार्श्वभूमी वर शिवसेनेचे शिष्टमंडळ महापालिका आयुक्तांना भेटले.

दरम्यान, ही सगळी कवायत रोष कमी करण्यासाठी केली जात असल्याचा आरोप आमदार अतुल सावे यांनी केला. ज्याची गरज नाही ती कामे प्राधान्याने केली. आधी पाणी उपसा करून ते शहरात आणले असते तर एवढी टंचाई भासली नसती. मात्र, सरकारला कोरडय़ा टाक्या बांधण्यातच अधिक रस आहे, असे आरोप आमदार सावे यांनी केला. चार वर्षांपासून पाणीपुरवठय़ात कोणतेही बदल झाले नाही. मग जलदगती जलवाहिनीवर कोणाला नळजोडण्या दिल्या, हे एकदा तपासले तरी पाणीपुरवठय़ातील दोष दिसू लागतील. मात्र, हे करायचे नाही, असा आरोपही आमदार सावे यांनी केला.

पाण्यावरून शिवसेना-भाजप समोरासमोर उभे ठाकल्याचे चित्र आता दिसू लागले आहे.कोणी तरी आंदोलन केले म्हणून आम्ही आयुक्तांच्या भेटीला गेलो नव्हतो. कोणतीही प्रसिद्धी न करता पाण्याबाबतच्या तीन बैठका घेतल्या आहेत. येत्या १५ मे ते १७ मे पर्यंत पाणी पुरवठा सुरळीत झालेला असेल. कोळशामुळे वीज टंचाई निर्माण होईल असे कोणाला वाटले नव्हते. अगदी पाच मिनिटे जरी वीज गेली तरी पाणी पुरवठा विस्कळीत होतो. -अंबादास दानवे, आमदार व शिवसेना जिल्हा प्रमुख औरंगाबाद

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या