जाती, धर्मामध्ये जाणीवपूर्वक विद्वेष निर्माण करण्याचा काही शक्तींचा डाव ; शरद पवार यांची टीका


पिंपरी :
काही शक्तींचा देशात वेगळे वातावरण निर्माण करण्याचा, तसेच जाती-धर्मात विद्वेष निर्माण करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न दिसून येतो आहे. मात्र, आम्हाला जाती, धर्मातील संघर्ष नको आहे. आम्हाला विकास हवा आहे. सततच्या वाढत्या महागाईतून सुटका हवी आहे. रोजगार हवा आहे. राज्य व देश प्रगत करण्यासाठी पूरक परिस्थिती हवी आहे. यासाठी धर्म, भाषिक एकता गरजेची आहे, असे मत ज्येष्ठ नेते व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भोसरीत बोलताना व्यक्त केले.

सर्वधर्मीय धर्मगुरूंच्या उपस्थितीत भोसरीत आयोजित ‘राष्ट्रीय एकात्मता मेळावा’ आणि ‘जश्ने ईद ए मिलन’ या कार्यक्रमात ते बोलत होते. राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे, शहराध्यक्ष अजित गव्हाणे, आमदार अण्णा बनसोडे, माजी आमदार विलास लांडे, माजी महापौर आझम पानसरे, संजोग वाघेरे आदी या वेळी उपस्थित होते.

पवार म्हणाले,की ईद होऊन गेली असली तरी ईदचा विचार जतन करणे आवश्यक आहे. जाती, धर्म, भाषा तथा जनमानसात एकवाक्यता निर्माण करणे आवश्यक आहे. भाईचारा वाढवणे, संकटकाळात एकमेकांना मदत करणे, दुर्बलांना शक्ती देणे अशा अनेक चांगल्या गोष्टींचे विचार धर्म मांडतो. कोणाचा द्वेष करायला कोणताही धर्म सांगत नाही. बंधुभाव ठेवा, विकास करा असेच धर्म सांगतो. 

पवार म्हणाले,की काश्मीर हा भारताचा हिस्सा आहे. मात्र शेजारच्या देशाला ते मान्य नाही. अतिरेकी शक्तींना बळ देऊन हिंदू-मुस्लीम ऐक्यावर हल्ले करण्याचा प्रयत्न सातत्याने या देशाकडून केला जातो. असे हल्ले झाल्यानंतर दुर्दैवाने तेथील जनतेकडून वेगळी भूमिका मांडण्याचा प्रयत्न होतो. काश्मीरमध्ये हिंदूंवर हल्ले झाले होते, तेव्हा केंद्रात व राज्यात भाजपच्या मदतीचे राज्य होते. मात्र, तरीही तोच विचार आता लोकांमध्ये संघर्षांचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न ‘काश्मीर फाईल्स’ मधून करतो, हे अत्यंत निंदनीय कृत्य आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांनी, सामान्य माणसाला संघटित करून, त्यांच्यातील आत्मविश्वास जागा करून सामान्य लोकांचे राज्य स्थापन केले. देशात मोघल, यादव अशी अनेकांची राज्ये झाली. तसे महाराष्ट्रात झाले नाही. शिवाजी महाराजांचे राज्य हे कायम ‘रयतेचे राज्य’ म्हणून ओळखले जाते. हा आदर्श शिवाजी महाराजांनी दिला. तो आदर्श डोळय़ासमोर ठेवून सामान्य माणसांच्या हितांची जपवणूक करणारे राज्य चालवण्याचा प्रयत्न आम्ही महाराष्ट्रात करत आहोत. राज्यातील जनतेने त्याला पािठबा दिला आहे, असे पवार म्हणाले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक अजित गव्हाणे यांनी केले. विनायक रणसुभे, दीपक साकोरे यांनी सूत्रसंचालन केले. युसूफ कुरेशी यांनी आभार मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या