भाजपाने कोल्हापुरात उमेदवार उतरवल्यानंतर संजय राऊतांचा गंभीर आरोप; म्हणाले “घोडेबाजार करण्यासाठी संभाजीराजेंची…”


राज्यसभेच्या निवडणुकीसाठी भाजपाने केंद्रीय वाणिज्यमंत्री पीयूष गोयल, माजी कृषी मंत्री डॉ. अनिल बोंडे आणि कोल्हापूरचे माजी खासदार धनंजय महाडिक यांना उमेदवारी जाहीर केली आहे. कोल्हापूरचे संभाजीराजे यांना पाठिंबा देण्यास नकार देऊन शिवसेनेने कोल्हापूरच्या संजय पवार यांना उमेदवारी जाहीर केली. म्हणूनच भाजपानेही कोल्हापूरचे माजी खासदार धनंजय महाडिक यांना तिसरे उमेदवार म्हणून रिंगणात उतरविले आहे. या घडामोडींवर शिवसेनेचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. भाजपाने संभाजीराजेंची ढाल केली असा आरोप त्यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना केला आहे.

“संभाजीराजे छत्रपती यांना कशाप्रकारे फसवण्याचा प्रयत्न सुरु होता हे स्पष्ट झालं आहे. यांना आपला उमेदवार द्यायचाच होता, घोडेबाजार करायचाच आहे. पण त्यासाठी संभाजीराजेंची ढाल करण्याचा प्रयत्न झाला. लोकशाही असून प्रत्येकाला निवडणूक लढण्याचा अधिकार आहे. पण महाराष्ट्रात कोणी घोडेबाजार करुन अशा पद्धतीच्या निवडणुका लढणार असतील तर सरकारचंदेखील सर्व घडामोडींवर लक्ष आहे,” असं संजय राऊत म्हणाले.

“आधी संभाजीराजेंना निवडणूक लढण्यास सांगितलं आणि आता नाव घेत नाही आहेत. संभाजीराजेंना पुढे करुन महाराष्ट्रातील राजकारणात गडबड करण्याचा प्रयत्न होता. अधिक पैसा खर्च करु शकतो, घोडेबाजार करु शकतो अशा पट्ट्यातून उमेदवार देण्यात आला आहे. पण मग संभाजीराजेंना बळीचा बकरा का केलं?,” अशी विचारणा संजय राऊतांनी केली आहे.

यावेळी संजय राऊतांनी विजयासाठी आवश्यक मतांचा कोटा आमच्याकडे असून दोन्ही उमेदवार जिंकतील असा विश्वास व्यक्त केला. “महाविकास आघाडीचे आणखी दोन उमेदवारही (काँग्रेस आणि राष्ट्रवादी) विजयी होतील. अशाप्रकारे आमचे चार उमेदवार जिंकतील,” असं संजय राऊत म्हणाले.

काँग्रेसमधील नाराजीवर बोलण्यास नकार देताना संजय राऊतांनी हा हायकमांडचा विषय असल्याचं सांगत जास्त भाष्य करणं टाळलं. “मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेत्यांमध्ये नेहमी चर्चा होत असते. काही मोठी गोष्ट असेल तर मुख्यमंत्री थेट सोनिया गांधींशी फोनवरुन चर्चा करत असतात,” असं संजय राऊत म्हणाले.

“काँग्रेसची देशात जी स्थिती आहे ते पाहता फार कमी लोकांना ते संधी देऊ शकतात. पक्षात जी व्यवस्था करायची होती ती त्यांनी केली आहे. महाराष्ट्रातून इम्रान प्रतापगढी यांना उमेदवारी दिली आहे. आता यावर आम्ही काय बोलणार?,” असं संजय राऊतांनी सांगितलं.

“काँग्रेसने त्यांचे जे प्रमुख लोक आहेत त्यांना देशभरातून जिथे जिथे सोय करता येईल तिथे सोय लावली आहे. स्थानिक उमेदवार दिला असता तर काँग्रेसला अधिक बळकटी मिळाली असती. पण कदाचित त्यांनी राष्ट्रीय स्तराचा, इतर राज्यांचा विचार केलेला दिसत आहे. संसदेत भाजपा सरकारला प्रत्युत्तर देणारी चांगली लोकं त्यांच्या नजरेत असू शकतात. कोणाला उमेदवारी द्यावी हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे, त्यावर शिवसेनेनं बोलणं योग्य नाही,” असं ते म्हणाले.

संजय राऊतांनी यावेळी महाविकास आघाडीतील काँग्रेस नेत्यांच्या नाराजीबाबत विचारलं असता ते म्हणाले की, “मुख्यमंत्री सक्षम आहेत. महाराष्ट्रात बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, नाना पटोले अशा काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची उद्धव ठाकरेंसोबत चर्चा होत असते. निधीबाबत म्हणाल तर शिवसेनेचे आमदारही नाराज असतात. मुख्यमंत्री यावर मार्ग काढू शकतात”.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या