म्हणाले, “अज्ञानांना…”
किती काळ तुम्ही बाबरीच्या विषयावर बोलणार आहात. देशात महागाई, बेरोजगारी, चीनने केलेली घुसरोखी यावरुन लक्ष हटवण्यासाठी हनुमान चालीसा आणि बाबरीच्या मुद्द्यावर भाजपा आणि त्यांच्याशी संबंधित पक्ष बोलत आहे. देशातील लोकांचे प्रश्न पाहा ना… बेरोजगारी किती वाढली आहे. महागाई किती वाढली आहे ते पहा अशा शब्दांत शिवसेना प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी भाजपावर आणि मनसेवर निशाणा साधला आहे. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
“बाबरी पाडली तेव्हा शिवसेना कुठे होती असं कोणी विचारत असेल तर त्यांनी त्यांच्याच पक्षातील नेते सुंदरसिंह भंडारी यांना विचारावं. त्या काळातील सीबीआयचा अहवाल तपासा. सीबीआयने तपास केला आहे. सीबीआयाने केलेल्या तपासाची पानं आणि केंद्रीय गुप्तचर खात्याचा अहवाल तपासावा. शिवसेना कुठे आहे असं विचारणाऱ्या अज्ञानांना शिवसेना कुठे होती आणि काय करत होती हे कळेल,” असं प्रत्युत्तर संजय राऊत यांनी फडणवीसांना दिलं आहे.
“इतक्या वर्षांनी फुलबाजे उडवायला झालं काय? संपलेला विषय का काढत आहेत?वातावरण बदललं आहे, प्रश्न बदलले आहेत. अशावेळी मूळ प्रश्नांवरुन लक्ष हटवण्यासाठी भाजपा आणि त्यांचे छुपे साथीदार याकडे लोकांना आकर्षित करत आहेत,” असं संजय राऊत म्हणाले.
“भोंग्यांपेक्षा महत्वाचे विषय आहेत. या भोंग्यांमागे कोणाची वीज आहे हे देशाला माहिती आहे. हे हिंदुत्व नाही,” अशी अप्रत्यक्ष टीका त्यांनी राज ठाकरेंवर केली.
राज ठाकरेंच्या अल्टिमेटमविषयी विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, “कोणत्या कलमाखाली काय कारवाई होईल, हा कायद्याच्या चौकटीतला विषय आहे. काहीच काम नसल्याने या विषयावर बोलत असाल तर तुम्ही महाराष्ट्र आणि देशाचं राजकारण खऱाब करत आहात. हे राष्ट्रहिताचं नाही. राष्ट्राला आणि राष्ट्रीय एकात्मतेला मारक आहे. भोंग्यामुळे लोकांना त्रास होतो असं आमचंही मत आहे. आम्ही त्याविरोधात लढाई दिली आणि त्यानंतर कोर्टाने निकाल दिला आहे. देशात कायद्याचं राज्य असेल तर पालन केलं पाहिजे”. हे लेचापेचांचं राज्य नाही. काय करायचं हे सरकारला माहिती आहे असंही यावेळी ते म्हणाले.
दरम्यान फडणवीसांनी तुम्ही रामाच्या बाजूने आहात की रावणाच्या अशी विचारणा केल्यासंबंधी विचारलं असता ते म्हणाले की, “त्यांनी रामायण पुन्हा एकदा वाचलं पाहिजे. त्यांनी रावणाचाही इतिहास वाचला पाहिजे. रावणाचा अंत अहंकाराने झाला. रावण त्याच्या अहंकारामुळे धारातीर्थी पडला. काही लोकांना सत्ता असल्याचा अहंकार असतो तर काहींना सत्ता गेल्यानंतही अहंकार येतो. विरोधी पक्षाच्या अंगात जो रावण संचारला आहे त्याचा अंत करावा आणि नंतर महाराष्ट्राच्या प्रश्नावर बोलावं”.
0 टिप्पण्या