मिरची स्पे मारुन दाम्पत्याला लुटणारा चोरटा गजाआड


गुन्हे शाखेची कारवाई

पुणे : दाम्पत्याच्या डोळ्यावर मिरची स्प्रे (पीपर स्प्रे) मारून महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावून पसार झालेल्या चोरट्याला गुन्हे शाखेने पकडले. त्याच्याकडून ४० हजारांचे मंगळसूत्र जप्त करण्यात आले आहे.

या प्रकरणी कुणाल गणपत जगताप (वय २१, रा. खराडी) याला अटक करण्यात आली आहे. आरोपी कुणालचा भाऊ अभिषेक याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याचा शोध घेण्यात येत आहे. वानवडी भागातील बी. टी. कवडे रस्त्यावर दाम्पत्य थांबले होते. त्या वेळी दुचाकीस्वार कुणाल आणि त्याचा भाऊ अभिषेक दुचाकीवरुन तेथे आले. दोघांनी दाम्पत्याच्या डोळ्यावर मिरची स्प्रे मारला. महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावून दोघे जण पसार झाले.

या गुन्ह्याचा गुन्हे शाखेच्या युनिट पाचकडून तपास करण्यात येत होता. चोरलेले दागिने घेऊन कुणाल हडपसर भागातील सराफ बाजारात विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. सापळा लावून त्याला पकडण्यात आले. सहायक आयुक्त गजानन टोम्पे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, सहायक निरीक्षक कृष्णा बाबर, रमेश साबळे, दया शेगर, अश्रृबा मोराळे, महेश वाघमारे आदींनी ही कारवाई केली.

मिरची स्प्रेचा वापर कशासाठी ?

आरोपी कुणाल जगताप चाकणमधील एका सराफी पेढीत कामाला होता. सराफी पेढीत सुरक्षेसाठी मिरची स्प्रे ठेवतात. चोरट्यांना रोखण्यासाठी या स्प्रेचा वापर केला जातो. जगतापने सराफी पेढीतून स्प्रे चोरला होता .रात्री अपरात्री कामावरुन जाणाऱ्या माहिती-तंत्रज्ञान कंपनीतील महिलांना सुरक्षेसाठी पिशवीत मिरची स्प्रे ठेवण्याच्या सूचना पोलिसांना दिल्या आहेत. मिरचीचा स्प्रेचा वापर सुरक्षेसाठी केला जात असला तरी चोरटे या स्प्रेचा वापर गुन्हा करण्यासाठी करतात. यापूर्वी मिरची स्प्रेचा वापर करुन चोरट्यांनी लुटमारीचे गुन्हे केल्याच्या घटना शहरात घडल्या आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या