आज रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील मुंबईशी सामना


 इंडियन प्रीमियर लीग क्रिकेट : चेन्नईला विजय अनिवार्य! 

मुंबई : इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) क्रिकेटमध्ये गुरुवारी मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज हे संघ आमनेसामने येणार आहेत. चेन्नईला बाद फेरीच्या आशा कायम राखण्यासाठी या सामन्यात विजय मिळवणे अनिवार्य आहे.

मुंबई (पाच वेळा विजेते) आणि चेन्नई (चार वेळा विजेते) या ‘आयपीएल’च्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघांना यंदाच्या हंगामात मात्र अपेक्षित कामगिरी करता आलेली नाही. चेन्नईला ११ पैकी चारच सामने जिंकता आले आहेत. आता आगेकूच करण्यासाठी त्यांनी उर्वरित सर्व सामने जिंकणे आणि अन्य निकाल त्यांच्या बाजूने लागणे आवश्यक आहे. चेन्नईच्या फलंदाजीची भिस्त डेव्हॉन कॉन्वे, ऋतुराज गायकवाड आणि कर्णधार महेंद्रसिंह धोनीवर आहे. गोलंदाजीत महीश थीकसाना, मोईन अली आणि मुकेश चौधरी हे महत्त्वाची भूमिका बजावतील.   

दुसरीकडे, रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील मुंबईला ११ पैकी केवळ दोन सामने जिंकता आले असून ते बाद फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडले आहेत. मात्र जसप्रीत बुमरा आणि इशान किशन यांसारख्या त्यांच्या अनुभवी खेळाडूंनी गेल्या दोन-तीन सामन्यांत चांगला खेळ केल्याचे पाहायला मिळाले आहे. ते या सामन्यातही दमदार कामगिरी करतील, अशी मुंबईला आशा आहे.

रोहित, विराटचा सल्ला महत्त्वाचा -इशान

मुंबईच्या संघाने यंदाच्या हंगामापूर्वी झालेल्या खेळाडू लिलाव प्रक्रियेत यष्टीरक्षक-फलंदाज इशान किशनवर १५.२५ कोटी रुपयांची बोली लावली. तो या लिलावातील सर्वात महागडा खेळाडू ठरला होता. मात्र या गोष्टीचा विचार करू नकोस, असा त्याला रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी सल्ला दिला. ‘‘माझ्यावर इतकी मोठी बोली लागल्यानंतर मला काही दिवस नक्कीच दडपण जाणवत होते. परंतु रोहित, विराट आणि हार्दिक पंडय़ा या अनुभवी सहकाऱ्यांनी मला या बोलीबद्दल विचार न करण्याचा सल्ला दिला. त्यांनी मला केवळ खेळातील सुधारणेकडे लक्ष देण्यास सांगितले. त्यांचा हा सल्ला माझ्यासाठी महत्त्वाचा ठरला,’’ असे इशान म्हणाला. * वेळ : सायं. ७.३० वा. * थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, २, १ हिंदी, सिलेक्ट १ (संबंधित एचडी वाहिन्यांवर)

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या