बंगळूरुवर सहा गडी राखून शानदार विजय; बाद फेरीतील स्थान जवळपास निश्चित

 


तेवतियाने पुन्हा गुजरातला तारले!;

राहुल तेवतियाने सलग दुसऱ्या सामन्यात विजयवीराची भूमिका बजावताना गुजरात टायटन्सला रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुविरुद्ध सहा गडी आणि तीन चेंडू राखून विजय मिळवून दिला. त्यामुळे  गुजरातने यंदाच्या ‘आयपीएल’मधील (आयपीएल) नवव्या सामन्यात आठवा विजय मिळवत १६ गुणांसह बाद फेरीमधील स्थान जवळपास निश्चित केले आहे.

कारकीर्दीतील कठीण टप्प्यातून जाणाऱ्या विराट कोहलीला तब्बल १४ सामन्यांनंतर (यंदाच्या हंगामातील ९ सामने) ‘आयपीएल’मध्ये अर्धशतक साकारता आले. त्यामुळे बंगळूरुने ६ बाद १७० धावा उभारल्या. त्यानंतर, गुजरातच्या डावात वृद्धिमान साहा (३१) आणि शुभमन गिल (२९) यांनी ५१ धावांची सलामी दिली. पण हे दोघे बाद झाल्यानंतर साई सुदर्शन (२०) आणि हार्दिक पंडय़ा (३) यांनी निराशा केल्यामुळे १३व्या षटकात गुजरातची ४ बाद ९५ अशी स्थिती होती. परंतु राहुल तेवतिया (नाबाद ४३) आणि डेव्हिड मिलर (नाबाद ३९) यांनी ७९ धावांची भागीदारी करीत संघाला जिंकून दिले.

त्याआधी, बंगळूरुचा कर्णधार फॅफ डय़ूप्लेसिस शून्यावर बाद झाल्यानंतर कोहली आणि रजत पाटीदार जोडीने दुसऱ्या गडय़ासाठी ९९ धावांची भागीदारी करीत धावसंख्येला आकार दिला. ब्रेबॉर्न स्टेडियमवरील चाहत्यांच्या साक्षीने सलामीवीर कोहलीने ५३ चेंडूंत सहा चौकार आणि एका षटकारासह ५८ धावा केल्या. पाटीदारने (५२) ‘आयपीएल’मधील पहिले अर्धशतक झळकावले, तर ग्लेन मॅक्सवेलने उत्तरार्धात १८ चेंडूंत ३३ धावांची वेगवान खेळी केली.

संक्षिप्त धावफलक

बंगळूरु : २० षटकांत ६ बाद १७० (विराट कोहली ५८, रजत पाटीदार ५२; प्रदीप सांगवान २/१९) पराभूत वि. गुजरात : १९.३ षटकांत ४ बाद १७४ (राहुल तेवतिया नाबाद ४३, डेव्हिड मिलर नाबाद ३९; शाहबाझ अहमद २/२६)

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या