औरंगाबाद : गुन्हे व गुन्हेगार शोध व जोडणी प्रणाली अर्थात सीसीटीएनएस (क्राईम अँण्ड क्रिमिनल ट्रॅकिंन नेटवर्क अँण्ड सिस्टीम) मध्ये औरंगाबाद ग्रामीण जिल्हा पोलीस दल सलग दुसऱ्यांदा राज्यात प्रथम आले आहे. पोलीस विभागाकडून ही माहिती गुरुवारी देण्यात आली. यवतमाळ व सिंधुदुर्ग हे अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकांवर राहिले.
सीसीटीएनएसच्या माध्यमात प्रथम खबर, गुन्हयांचा तपशील (घटनास्थळ पंचनामा), अटक आरोपी, जप्ती/मालमत्ता, दोषारोपपत्र, न्यायालयाचा निकाल, न्यायालयातील अपील, हरविलेले व अनोळखी व्यक्ती मिळून येणे, अनोळखी मृतदेह, संघटित गुन्हेगारी टोळी, अदखलपात्र खबर (एन.सी.), गहाळ, बेवारस व सोडून दिलेली मालमत्ता, प्रतिबंधात्मक कारवाई आदींबाबतच्या माहितीचे १८ प्रकार आहेत. या प्रकारातील माहिती पोलीस ठाणेनिहाय तात्काळ भरणे गरजेचे असते. तसेच याच प्रणालीच्या माध्यमातून नागरिकांना ऑनलाईन विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. ज्यामध्ये ई-तक्रार, सर्व प्रकारच्या परवानगी, नागरिकांकरिता सूचना आदींचा समावेश आहे. त्याचा निपटारा केला जातो. आदी कामांमधून जिल्हा घटक पोलीसांद्वारे केलेल्या कामाची दखल राज्यस्तरावर घेतली जाते. राज्य गुन्हे अन्वेषण विभागाद्वारे प्रत्येक महिन्याला उपरोक्त नमूद सर्व मुद्यांबाबतच्या कामगिरीचा राज्यस्तरीय जिल्हानिहाय आढावा घेण्यात येतो. मार्च-२०२२ मध्ये घेतलेल्या राज्यस्तरीय आढाव्यानुसार एकूण २३२ गुणांचे गुणांकनपैकी २१७ गुण प्राप्त करत औरंगाबाद ग्रामीण जिल्हा पोलीस दल हे राज्यात पहिल्या क्रमांकावर ठरले. यवतमाळ द्वितीय तर सिंधुदुर्ग हे तिसऱ्या क्रमांकावर राहिले. औरंगाबादचे पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया, सीसीटीएनएसचे समन्वयक अधिकारी तथा अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड यांच्या मार्गदर्शनाखाली सीसीएनटीएस कक्षाच्या मनीषा जोगदंड यांच्या पथकाने या प्रणालीअंतर्गत उत्कृष्ट कामकाज केल्याचे पोलीस विभागाकडून सांगण्यात आले.
0 टिप्पण्या