इंडियन प्रीमियर लीग क्रिकेट : ललितच्या अष्टपैलूत्वाची कसोटी


दिल्लीचा आज हैदराबादशी सामना

मुंबई : दिल्ली कॅपिटल्सच्या अष्टपैलू ललित यादवला मुख्य प्रशिक्षक रिकी पाँटिंगचा विश्वास सार्थ करीत स्वत:ला सिद्ध करावे लागणार आहे. इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) क्रिकेटची बाद फेरी गाठण्यासाठी विजय आवश्यक असलेल्या दिल्लीचा गुरुवारी सनरायजर्स हैदराबादशी सामना होणार आहे.

दिल्लीचे सलग तिसऱ्या हंगामात प्रतिनिधित्व करणाऱ्या ललितने नऊ सामन्यांत फलंदाजीत फक्त १३७ धावा केल्या आहेत आणि गोलंदाजीत चार बळी मिळवले आहेत. त्यामुळे दिल्लीला अपेक्षित असलेली विजयवीराची भूमिका त्याच्याकडून साकारताना दिसत नाही. दिल्लीने आतापर्यंत नऊपैकी चार विजयांसह आठ गुण मिळवले आहेत, परंतु त्यांचे पाच पराभव झाले आहेत. त्यामुळे कामगिरी आणि संघ समतोल साधण्यात हा संघ अपयशी ठरल्याचे स्पष्ट होते. प्रतिस्पर्धी हैदराबादने नऊ सामन्यांपैकी पाच विजयांसह १० गुण कमावले असून, त्यांचे चार पराभव झाले आहेत.

कुलदीप यादव (१७ बळी) आणि खलील अहमद (११ बळी) यांच्यावर दिल्लीच्या गोलंदाजीची जबाबदारी आहे. मुस्ताफिझूर रेहमानच्या (८ बळी) कामगिरीत सातत्य दिसत नाही. कर्णधार ऋषभ पंतच्या (२३४ धावा) खेळात आक्रमकता आहे. डेव्हिड वॉर्नर (२६४ धावा) आणि पृथ्वी शॉ (२५९ धावा) यांच्यावर दिल्लीच्या फलंदाजीची भिस्त आहे.

उमरान मलिक (१५ बळी), टी. नटराजन (१७ बळी), भुवनेश्वर कुमार (९ बळी) आणि मार्को यान्सेन (६ बळी) या हैदराबादच्या वेगवान माऱ्यापुढे दिल्लीच्या फलंदाजीची अग्निपरीक्षा ठरणार आहे. युवा सलामीवीर अभिषेक शर्मा (३२४ धावा) लक्षवेधी फलंदाजी करीत आहे. अभिषेक, एडीन मार्करम (२६३ धावा) आणि राहुल त्रिपाठी (२२८ धावा) यांनाच हैदराबादच्या विजयांचे श्रेय जाते. कर्णधार केन विल्यम्सनकडून (१९५ धावा) अपेक्षित धावा झालेल्या नाहीत.

वेळ : सायं. ७.३० वा.

 थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्टस १, १ हिंदी, सिलेक्ट १ 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या