राज ठाकरेंच्या अल्टिमेटमवर संजय राऊत संतापले


फडणवीसांवर निशाणा साधत म्हणाले “हिंदू ओवेसींना सुपारी…”

एखाद्या पक्षाने अल्टिमेटम दिला म्हणून राज्य चालत नाही आणि निर्णय घेतले जात नाहीत. एक प्रशासकीय व्यवस्था असते. कायद्याचं राज्य आहे म्हटल्यावर अल्टिमेटमवर निर्णय घेतले जात नाहीत. महागाई १०० दिवसात कमी होईल असाही अल्टिमेट काहींनी दिला होता. पण झाली का? राज्यात कायदा सुव्यवस्था व्यवस्थित आहे असं सांगत शिवसेना प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी राज ठाकरेंवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे.

“सभेतून इशारा दिले, धमक्या दिल्या म्हणजे परिस्थती बिघडली असं होत नाही. त्यामुळे आपण इशारे दिल्यानंतर त्याचे पडसाद उमटतील अशा भ्रमात कोणी राहू नये,” असंही संजय राऊत म्हणाले. आज शुभ दिवस आहे. आज अक्षय्य तृतीया, रमजान आहे त्यामुळे लोकांना सण साजरा करु द्या असं आवाहन यावेळी त्यांनी केलं.

“एखाद्या राजकीय पक्षाला महाराष्ट्राची शांतता बिघडवायची असेल आणि त्यांना कोणी सुपारी दिली असेल तर सरकारने आधी सुपारी देणाऱ्यांचा शोध घेतला पाहिजे. हिंदू ओवेसींना सुपारी देऊन महाराष्ट्रातील शांतता बिघडण्यासाठी जे काही सुरु आहे त्यासाठी सरकार सक्षम आहे. मी काल मुख्यमंत्र्यांशी बराच वेळ चर्चा केली. सगळं शांत आहे. कोणी मनात आणलं म्हणून राज्याची कायदा सुव्यवस्था बिघडू शकत नाही. इतकं हे राज्य मजबूत पायांवर उभं आहे. राज्यातील प्रशासनाला आणि राज्यकर्त्यांना राज्य चालवण्यचा मोठा अनुभव आहे. कोणीही उठतो आणि धमक्या देतो हे करु ते करु तर तसं होणार नाही,” असं म्हणत राऊतांनी राज ठाकरेंवर निशाणा साधला.

“धमक्या देणाऱ्यांची तेवढी ताकद नाही. पण त्यांच्या मागे ज्या काही शक्ती आहेत ते अस्वस्थ आत्मे आहेत, त्यांना महाराष्ट्रात सत्तेवर येता आलं नाही. त्यांना लोकांनी दूर केलं आहे. त्याचं वैफल्य दुसऱ्यांच्या माध्यमातून ते बाहेर काढत आहेत. याला शौर्य म्हणात नाहीत. त्यांनी समोर येऊन लढलं पाहिजे. सुपारी देऊन लढायचं असेल तर लढावं. त्यातच त्यांचा वेळ जाणार आहे. सरकार सरकारचं काम करत आहे,” अशी राऊतांनी भाजपावर अप्रत्यक्ष टीका केली.

“माणसांना जे वापरण्यासाठी ठेवले जातात त्याला उपवस्त्र म्हणतात. महाराष्ट्रात महाविकास आघाडी आणि शिवसेनेवर हल्ला करण्यासाठी राजकारणात असे वापर सुरु आहेत. ज्यांची स्वत:ची हिंमत नाही असे बिनहिमतीचे लोक असे छोटे लोक, पक्ष पकडतात आणि आमच्यावर हल्ला करायला लावतात. आम्ही लढण्यासाठी सक्षम आहोत,” असं राऊत म्हणाले.

“अरे कसला अल्टिमेटम, त्यांनी आधी स्वत:चा पक्ष सांभाळावा. महाराष्ट्रात कायद्याचं राज्य आहे म्हटल्यावर सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार संपूर्ण देशात जी भूमिका घेतली जाईल ती महाराष्ट्रात घेतली जाईल. राज्यात बेकदायेदशीर कृत्य केलं जाणार नाही. राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील हे एक संयमी आणि सक्षम नेते आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तितकेच सक्षम आणि मजबूत नेते आहेत. महाविकास आघाडीचे मार्गदर्शक शरद पवार सगळ्यात अनुभवी नेते आणि प्रशासक आहेत. त्यामुळे या राज्यात कोणी अल्टिमेटम देऊन वातावरण बिघडवण्याच्या प्रयत्नात असतील तर ते संभ्रमात आहेत. राज्याची जनता सुज्ञ आहे,” असं संजय राऊतांनी सांगितलं.

“फुले विरुद्द टिळक असे वाद कोणी लावत असेल तर तर तेदेखील निरर्थक आहेत. अशाप्रकारे टिळक आणि फुले यांच्याविषयी वाद निर्माण करुन जे वादाला फोडणी घालत आहेत त्यांचे मनसुबे फसले आहेत,” अशी टीका संजय राऊतांनी केली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या