मात्र या वर्षीच्या उन्हाळय़ात गतवर्षीपेक्षा कमी बाष्पीभवन

 


जायकवाडीतील बाष्पीभवनाचा पाच वर्षांतील जोर अधिकच

औरंगाबाद: उन्हाची काहिली वाढत असली तरी गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी जायकवाडी धरणाच्या बाष्पीभवनाची टक्केवारी कमी असल्याचे दिसून येत आहे. मार्च आणि एप्रिल महिन्यातील बाष्पीभवनाचा दर प्रतिदिन १.८ दशलक्षघनमीटर (दलघमी) एवढा असतो. तर मराठवाडय़ातील मोठय़ा ११ धरणांमध्ये प्रतिदिन ५.६ दलघमी एवढे बाष्पीभवन होते. गेल्या वर्षी मे महिन्यात ५६.३१ दलघमी बाष्पीभवन झाले होते तर या वर्षी ते ४३ दलघमी एवढेच आहे.

राज्यातील अन्य धरणाच्या तुलनेत जायकवाडीचा आकार मोठा आहे. धरण जेव्हा शंभर टक्के भरते तेव्हा त्याचा पाणीपसारा ३५ हजार हेक्टर एवढा असतो. त्यामुळे जेवढा पाणी पसारा अधिक तेवढे बाष्पीभवनही अधिक. जायकवाडी धरणाचा आकार चहाच्या बशीसारखा आहे. गेल्या पाच वर्षांत जायकवाडीतील बाष्पीभवनाचा वेग अधिक असल्याचे दिसून आले. त्याला २०१९ हे वर्ष अपवाद होते. जायकवाडी धरणातील पाणीसाठा २०१९ मध्ये उणे चिन्हात गेला होता. धरणाच्या पातळीच्या शून्यापेक्षाही कमी असल्याने तेव्हा सर्वात कमी म्हणजे १८.२१९ दलघमी एवढे बाष्पीभवन नोंदले गेले. मे महिन्यात उन्हाचा पारा खूप अधिक असतो. त्यामुळे बाष्पीभवनही अधिक होते. या वर्षी ऊन जरा अधिक आहे, पारा ४२ अंशावर गेला पण तुलनेने गेल्या वर्षीच्या मे महिन्याच्या तुलनेत या वर्षी बाष्पीभवन कमी असल्याची नोंद जलसपंदा विभागात आहे.

ऊन जास्त आहे हे खरेच पण गेल्या वर्षी ते अधिक होते. कारण गेल्या वर्षीचा बाष्पीभवनाचा वेग अधिक होता असे आकडेवारी तपासल्यानंतर लक्षात येत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या