औरंगाबाद विमानतळाच्या नामांतराची मागणी औरंगाबाद : चे संभाजीनगर नामकरण करण्याच्या मागणीवरून भाजपने शिवसेनेला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न सुरू केला असतानाच औरंगाबाद विमानतळाचे   छत्रपती संभाजी महाराज विमानतळ असे नामांतर करावे आणि विमानतळावर संभाजी महाराजांचा पुतळा उभारावा अशा  मागण्या उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी  केंद्रीय  नागरी विमान वाहतूकमंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांची मंगळवारी नवी दिल्लीत भेट घेऊन केल्या.

मराठवाडय़ातील पर्यटन व औद्योगिकदृष्टया महत्त्वाच्या असणाऱ्या औरंगाबाद विमानतळाच्या धावपट्टीचा विस्तार करून विमानतळ आंतरराष्ट्रीय दर्जाचे व्हावे, अशी मागणी औरंगाबादचे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी केली. दिल्लीतील राजीव गांधी भवन या नागरी विमान वाहतूक मंत्रालयामध्ये सुभाष देसाई यांनी ज्योतिरादित्य शिंदे यांची भेट घेतली. औरंगाबाद विमानतळाचे नामकरण ‘छत्रपती संभाजी महाराज विमानतळ’ करणे, विमानाच्या  फेऱ्या वाढविणे आदी विषयांवर यावेळी सकारात्मक चर्चा झाली. या बाबतचे निवेदनही सुभाष देसाई यांनी दिले. यावेळी केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराडही उपस्थित होते. मराठवाडय़ात अजिंठा-वेरुळ लेण्यांसह विविध पर्यटनस्थळे आहेत. या पर्यटनस्थळांना मोठय़ा संख्येने पर्यटक भेटी देतात.  औरंगाबाद विमानतळाची सध्याची धावपट्टी लहान पडत असून या धावपट्टीच्या विस्ताराची गरज असल्याचे देसाई यांनी निदर्शनास आणून दिले. या कामी स्थानिक प्रशासनाकडून आवश्यक जमीन अधिग्रहण करण्यात येईल. तसेच पुढील प्रक्रियेसाठी नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने हा विषय गतीने पुढे न्यावा व औरंगाबाद विमानतळ आंतरराष्ट्रीय दर्जाचे विमानतळ करावे, अशी विनंती देसाई यांनी केली. राज्य शासनाने जमीन अधिग्रहण करून दिल्यास विमानतळ धावपट्टीचा विषय तत्परतेने मार्गी लावू असे आश्वासन शिंदे यांनी दिले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाच्या बैठकीत औरंगाबाद विमानतळाचे नामकरण ‘छत्रपती संभाजी महाराज विमानतळ’ करण्यास मंजुरी देण्यात आली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या