औरंगाबाद : पाणीप्रश्नी तातडीने उपाययोजना राबवून आठ दिवसांत १५ एमएलडी पाणी वाढ करून जनतेचे पाण्यावाचून होणारे हाल थांबणार आहेत. त्यासोबतच समाधानकारक पाणी मिळत नाही तोपर्यंत चार हजार रुपयाची पाणीपट्टी ५० टक्क्यांनी कमी करून ती दोन हजार रुपये घेण्यात यावी असा निर्णय बैठकीत घेण्यात आला असल्याचे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी आज शुक्रवारी जाहीर केले. पाणीपुरवठय़ावरून निर्माण झालेला रोष कमी करण्यासाठी शिवसेनेने केलेली खेळी लक्षवेधक मानली जात आहे.
शहराचा पाणीटंचाई निवारण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या उपाययोजनांचा आज शुक्रवारी पालकमंत्री सुभाष देसाई यांनी आढावा घेतला. स्मार्ट सिटीच्या कार्यालयात झालेल्या बैठकीस जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, मनपा प्रशासक तथा आयुक्त आस्तिककुमार पाण्डेय, पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश गटणे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता अजयसिंग, शहर अभियंता सखाराम पानझडे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.
या बैठकीत मनपा प्रशासनाने ४२ मुद्दय़ांवर उपाययोजना राबवून आठ दिवसांत शहराचा १५ एमएलडीने पाणीपुरवठा वाढणार असल्याचा विश्वास व्यक्त केला. यावर पालकमंत्री देसाई यांनी समाधान व्यक्त करीत समान पाणी वाटप करण्याची सूचना प्रशासनाला केली. त्यासोबतच शहरात जोपर्यंत समाधानकारक पाणीपुरवठा होत नाही, तोपर्यंत नागरिकांवर आकारण्यात आलेली चार हजार रुपयांची पाणीपट्टी ५० टक्क्यांनी कमी करून ती २ हजार रुपये एवढी आकारण्याचा निर्णय घेण्यात आला.
0 टिप्पण्या