गणित, भाषा, विज्ञानात विद्यार्थ्यांची कामगिरी खालावली; करोनाकाळात शाळा बंद असल्याचा फटका


पुणे :
करोना काळात शाळा बंद असल्याचा परिणाम राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षणात (नॅस) दिसून आला आहे. २०१७तील सर्वेक्षणाच्या तुलनेत २०२१मधील सर्वेक्षणामध्ये राज्यातील विद्यार्थ्यांची कामगिरी गणित, भाषा, पर्यावरण अभ्यास, विज्ञान या विषयांत खालावल्याचे दिसून येत आहे. तिसरीच्या विद्यार्थ्यांची कामगिरी राष्ट्रीय सरासरीच्या तुलनेत समाधानकारक दिसत असून, पाचवी, आठवी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांची कामगिरी राष्ट्रीय सरासरीपेक्षा जराशीच जास्त आहे.

राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेकडून ऑक्टोबर २०२१मध्ये देशभरात एकाचवेळी राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण घेण्यात आले. देशभरातील ३६ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील ७२० जिल्ह्यांतील १ लाख १८ हजार शाळांतील ३४ लाख विद्यार्थ्यांचा या सर्वेक्षणात सहभाग होता. तर, राज्यातील ७ हजार २२६ शाळांतील तिसरी, पाचवी, आठवी आणि दहावीच्या मिळून २ लाख १६ हजार ११७ विद्यार्थ्यांचा आणि ३० हजार ५६६ शिक्षकांनी सर्वेक्षणात सहभाग घेतला.

२०१७मध्ये राज्यातील तिसरीच्या विद्यार्थ्यांना भाषा विषयात ५०० पैकी ३४४ गुण होते, गणितात ३२५ गुण होते, तर पर्यावरण अभ्यास विषयात ३३० गुण होते. तर २०२१च्या सर्वेक्षणात भाषा विषयात ३३३, गणितात ३१६, पर्यावरण अभ्यास विषयात ३१६ गुण मिळाले. २०१७मध्ये पाचवीच्या विद्यार्थ्यांना भाषा विषयात ३२३, गणितात ३६५, पर्यावरण अभ्यासात ३०४ गुण होते, तर २०२१च्या सर्वेक्षणात भाषा विषयात ३१७, गणितात २८७, पर्यावरण अभ्यासात २९१ गुण मिळाले. २०१७मध्ये आठवीच्या विद्यार्थ्यांना भाषा विषयात ३२०, गणितात २६३, विज्ञानात २६६ आणि समाजशास्त्रात २७४ गुण होते. तर  २०२१मध्ये भाषा विषयात ३१०, गणितात २५०, विज्ञानात २४८ आणि समाजशास्त्रात २५७ गुण मिळाले. तर २०१७मध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांना गणितात २५४, विज्ञानात २५०, समाजशास्त्रात २५४, इंग्रजीत २५४, आधुनिक भारतीय भाषेत २६३ गुण मिळाले होते. तर २०२१च्या सर्वेक्षणात गणितात २११, विज्ञानात २०२, समाजशास्त्रात २३३, इंग्रजीत २८६ आणि आधुनिक भारतीय भाषेत २६७ गुण मिळाले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या