संतापलेल्या राज ठाकरेंच्या ‘त्या’ टीकेचा रोख राऊतांच्या दिशेने?


“महाराष्ट्राची काय हालत करुन ठेवलीय, आई-बहिणीवरुन शिव्या…”; 

औरंगाबाद : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची सभा काल म्हणजेच महाराष्ट्र दिनी औरंगाबादमध्ये पार पडली. या सभेमध्ये राज ठाकरेंनी पुन्हा एकदा मशिदींवरील भोंग्यांचा मुद्दा अधोरेखित केला. सरळ सांगून भोंगे निघणार नसतील तर मग होऊन जाऊ द्या, एकदा अशी आक्रमक भाषा वापरत राज ठाकरेंनी दुप्पट आवाजात मशीदींसमोर हनुमान चालिसा वाजविण्याची भूमिका जाहीर केली. येथील सभेत राज यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली. मात्र भाषणादरम्यान राज ठाकरे यांनी कोणत्याही नेत्याचा स्पष्ट उल्लेख न करताना सध्या नेते हे मुद्द्यांवर बोलत नसून शिव्या देताना दिसतात अशी खंतही व्यक्त केली. राज यांनी थेट कोणाचेही नाव घेतले नसले तरी त्यांचा इशारा अप्रत्यक्षपणे शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांच्या दिशेने असल्याची चर्चा आहे.

महाराष्ट्र दिनी भाषण करताना राज ठाकरेंनी महाराष्ट्राचं राष्ट्राच्या जडणघडणीमध्ये असलेलं योगदान अधोरेखित केलं. “सर्वाधिक समाज सुधारक या महाराष्ट्राने दिले, विचारवंत महाराष्ट्राने दिले. एक गोष्ट अशी नाही की जी महाराष्ट्रामध्ये कधी जन्माला नाही आली आणि ती महाराष्ट्राने इतरांना नाही दिली,” असं राज ठाकरेंनी म्हटलं. मात्र पुढच्याच वाक्यामध्ये त्यांनी सध्याच्या नेत्यांकडून वापरल्या जाणाऱ्या भाषेवर आक्षेप घेतला. “…आणि आज काय महाराष्ट्राची हालत करुन ठेवलीय, आपण आई-बहिणीवरुन शिव्या घालतायत. कोणी मुद्द्याचं बोलायलाच तयार नाहीय सगळे गुद्द्यांवरती बोलतायत

आम्ही काय शिकवतोय तरुणांना? हुल्लडबाजी?,” असा प्रश्न राज यांनी भाषणादरम्यान उपस्थित केला.

राऊत नेमकं काय म्हणालेले?

संजय राऊत यांनी साधारण महिनाभरापूर्वी भाजपाचे नेते किरीट सोमय्यांसंदर्भात बोलताना अपशब्दांचा वापर केला होता. आयएनएस विक्रांतसंदर्भात सोमय्या यांनी केलेल्या ५७ लाखांच्या कथित घोटाळा प्रकरणावरुन दोन्ही नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. संजय राऊत यांनी सोमय्यांवर आरोप केल्यानंतर सोमय्यांनी राऊतांना उत्तर देताना संजय राऊतांचा हा नवीन पराक्रम असल्याचं वक्तव्य केलं होतं. याचसंदर्भात राऊतांना पत्रकार परिषदेत विचालं असता त्यांनी येड असा आक्षेपार्ह शब्द वापरला. “येड आहे तो, हे मी ऑन रेकॉर्ड बोलतोय. महाराष्ट्रात अशा चु लोकांना स्थान नाही. महाराष्ट्राला लागलेली ही कीड असून ही कीड संजय राऊत, शिवसेना संपवणार. हा चु पराक्रम काय सांगतो मला,” अशा शब्दांत संजय राऊतांनी संताप व्यक्त केला होता. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या