मे महिन्यात काहिलीत घट; पूर्वमोसमी पाऊस अधिक


 हवामानशास्त्र विभागाकडून मासिक अंदाज

पुणे : मार्चपाठोपाठ संपूर्ण एप्रिल महिन्यात कमाल तापमानातील मोठी वाढ आणि उष्णतेच्या लाटांनी राज्याला हैराण केले असले, तरी मे महिन्यात काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात मे महिन्यात बहुतांश भागात कमाल तापमान सरासरीच्या खाली राहण्याचा अंदाज आहे. मात्र, पूर्वमोसमी पाऊस सरासरीपेक्षा अधिक होणार असल्याचे भारतीय हवामानशास्त्र विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. देशपातळीवर उत्तर-पश्चिम राज्यांमध्ये सरासरीपेक्षा अधिक तापमान राहणार असून, संपूर्ण देशात पूर्वमोसमी पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा अधिक म्हणजे १०९ टक्के राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

मार्च महिन्यापासून उत्तर-दक्षिण, उत्तर आणि मध्य भारतात उन्हाच्या झळा तीव्र आहेत. अद्यापही उत्तर भारतापासून विदर्भापर्यंत उष्णतेची लाट कायम आहे. विदर्भात कमाल तापमानाचा नवनवा उच्चांक गाठला जात आहे. या विभागात आणखी दोन दिवस काही ठिकाणी उष्णतेची लाट कायम राहणार आहे. अशा स्थितीत राज्याला वाढत्या तापमानापासून दिलासा देणारा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे. एप्रिलमध्ये विदर्भ, मराठवाडय़ात कमाल तापमानाचा पारा सरासरीपेक्षा ३ ते ५ अंशांनी वाढून ४२ ते ४६ अंशांपर्यंत पोहोचला. मध्य महाराष्ट्रातही २ ते ४ अंशांनी कमाल तापमान अधिक राहिले. मे महिन्यात मात्र सर्वच विभागातील कमाल तापमान घटणार आहे.

हवामान विभागाने मे महिन्याच्या तापमानाबाबत जाहीर केलेल्या नकाशानुसार उत्तर महाराष्ट्र आणि कोकणात कमाल तापमान सरासरीच्या जवळपास राहण्याची शक्यता आहे. सध्या होरपळत असलेला विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील अनेक भागात कमाल तापमान सरासरीच्या तुलनेत कमी राहणार आहे. त्यामुळे वाढत्या तापमानापासून या विभागांना दिलासा मिळणार आहे. संपूर्ण देशात पूर्वमोसमी पाऊस मे महिन्यात यंदा सरासरीपेक्षा अधिक राहणार आहे. मे मधील देशातील पूर्वमोसमी पावसाची सरासरी ६१.४ मिलिमीटर आहे. यंदा त्यापेक्षा अधिक पाऊस होईल. महाराष्ट्रातही सरासरीपेक्षा अधिक पूर्वमोसमी पाऊस पडणार आहे.

विदर्भात १२२ वर्षांतील उच्चांकी तापमान

यंदा मार्च महिन्यामध्ये देशात १२२ वर्षांमधील उच्चांकी तापमानाची नोंद झाली होती. हवामानाची नोंद होत असलेल्या कालावधीतील तापमानाचे सर्व उच्चांक मार्च महिन्याने मोडले. एप्रिलमध्ये संपूर्ण देशातील १२२ वर्षांतील चौथे उच्चांकी तापमान नोंदविले गेले. मात्र, देशाच्या उत्तर-पश्चिम भागासह विदर्भाचा समावेश असलेल्या मध्य भारतामध्ये यंदा एप्रिलमधील तापमान १२२ वर्षांतील पहिले उच्चांकी तापमान ठरले. २९ एप्रिलला चंद्रपूरला उच्चांकी ४६.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. तो उच्चांक एकाच दिवसात मोडीत निघाला. शनिवारी (३० एप्रिल) चंद्रपूरमध्ये ४६.६ अंश कमाल तापमान नोंदविले गेले.


तापमानवाढीतून दिलासा कशामुळे?

मार्च आणि एप्रिलमध्ये उत्तरेकडील बहुतांश राज्यांत उष्णतेची लाट होती. तेथून महाराष्ट्राच्या दिशेने कोरडे आणि उष्ण वाऱ्यांचे प्रवाह वाहत असल्याने राज्यात उष्णतेच्या लाटा आल्या. आता मे महिन्यातही उत्तर आणि उत्तर-पश्चिम भागातील राजस्थान, पंजाब, हरियाणा, दिल्ली, चंडिगड, जम्मू आणि हिमाचल प्रदेशातील कमाल तापमान सरासरीच्या पुढे राहण्याचा अंदाज आहे. राजस्थान आणि गुजरातमधील काही भागात उष्णतेच्या लाटा येऊ शकतात. मात्र, या महिन्यात तेथून महाराष्ट्राच्या दिशेने वारे वाहण्याची शक्यता कमी असल्याने महाराष्ट्रातील तापमानात मोठी वाढ होणार नाही.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या