मराठवाडय़ातील ७५ पैकी ६९ नगरपालिका क्षेत्रांत सरासरी चार दिवसाआड पाणी


औरंगाबाद :
शहरात भाजपने काढलेल्या जलआक्रोश मोर्चामुळे मराठवाडय़ातील महापालिकेच्या क्षेत्रातील पाणीपुरवठय़ाचा प्रश्न ऐरणीवर आला असून औरंगाबादमध्ये सात दिवसांनी तर लातूरमध्ये दहा दिवसांनी एकदा पाणी येते. नांदेड व परभणी येथे तीन दिवसाला पाणी येते. तर मराठवाडय़ातील ७५ नगरपालिका क्षेत्रांपैकी ६९ नगरपालिका क्षेत्रांत सरासरी चार दिवसाआड पाणीपुरवठा होतो.

जालना व बीड या जिल्हा ठिकाणच्या नगरपालिकांमध्ये प्रत्येकी आठ व सहा दिवसाआड एकदा पाणीपुरवठा होतो. त्यामुळे आमच्या आक्रोशाचे काय, असा प्रश्न आता भाजपला विचारला जात आहे. मोर्चात सहभागी होणाऱ्या रावसाहेब दानवे यांच्या भोकरदनमध्ये पाच दिवसाआड पाणी येते तर १५ दिवसाला एकदा पाणी देणारी नगरपालिका आहे बदनापूर. हा भाग भाजपचे आमदार नारायण कुचे यांच्या मतदारसंघातील. औरंगाबादसाठी पुढाकार घेणारे भाजप नेत्यांच्या मतदारसंघातील नगरपालिकांमधील पाणीपुरवठा योजनांवर बोट ठेवले जात आहे.

औरंगाबाद शहराच्या पाणीपुरवठय़ाचा प्रश्न गेल्या १५ वर्षांपासून रखडलेला असल्याने भाजपने शिवसेनेला घेरले. पण भाजप नेत्यांच्या मतदारसंघातील प्रमुख शहरातील पाणीपुरवठय़ाचा बोजवाराच उडालेला आहे. लातूर शहरातील पाणीप्रश्न राष्ट्रीय पातळीवर चर्चेत आला. रेल्वेने पाणी आणले गेले. पण शहराच्या पाण्याचा प्रश्न काही मिटला नाही. दहा दिवसाला येणारे पिवळे पाणी हा प्रश्न चर्चेत आहे. जालना शहरातील पाणी प्रश्नही सोडविण्यासाठी दुष्काळात बरीच चर्चा झाली. दररोज ८० कोटी रुपयांची पाण्याची बाजारपेठ बनलेल्या जालना शहराला पुढे पाणीपुरवठा योजना मंजूर झाली पण आजही आठ दिवसाला एकदाच पााणी मिळते. धरणामध्ये पुरेसा पाणीसाठा असतानाही पाणीबाणी कायम आहे. जालना जिल्ह्यातील आठपैकी एकाही नगरपालिका शहरात दररोज पाणीपुरवठा होत नाही. लातूर जिल्ह्यातील नगरपालिकांमध्ये पाणीबाणी अधिक आहे. आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांचे गाव असणाऱ्या निलंगा शहरात ११ दिवसाला एकदा पाणी येते. बीड शहरात सहा दिवसाला तर दुष्काळी अशी ओळख असणाऱ्या आष्टीमध्ये सहा दिवसाला एकदा पाणी येते. कुठे अपुरा पाणीपुरवठा तर कुठे अस्वच्छ पाणी. सत्ता असताना भाजपनेही पाणी प्रश्नाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप आता होतो आहे. करोनामुळे गेली दोन वर्षे विकासकामे करणे शक्य नव्हते. त्यामुळे रखडलेल्या पाणीपुरवठा योजनांची स्थिती  दयनीय आहे.

धरणात पाणी तरीही टंचाई

जायकवाडीसह प्रमुख धरणांमध्ये पाणी असतानाही पाणीटंचाई निर्माण होण्यामागे अंतर्गत वितरण व्यवस्था हेच कारण असल्याचे दिसून येत आहे. बहुतांश नगरपालिका क्षेत्रांतील पाणीपुरवठा योजना १९७०-८० दशकात झालेल्या. आता त्या एवढय़ा खंगून व गंजून गेल्या आहेत की पाणीपुरवठा करणे अवघड होऊन बसते असे बहुतांश मुख्याधिकारी सांगतात. पाणीपुरवठा योजनांचा मंत्रालय स्तरावर आढावा झाला तरी लागणारा  निधी पुरेशा प्रमाणात मिळत नसल्याने मराठवाडय़ातील जलआक्रोश कायम आहेत.

सात पालिका क्षेत्रांत दररोज पाणीपुरवठा

औरंगाबादमधील पैठण, नांदेड जिल्ह्यातील कुंडलवाडी, किनवट, धर्माबाद, बिलोली, अर्धापूर, हिमायतगर अन्यत्र सगळीकडे किमान दोन ते कमाल १५ दिवसाला एकदा पाणीपुरवठा होतो.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या