खासगी टँकरची व मोठय़ा बाटल्यांची किंमत वाढली
औरंगाबाद: उन्हामुळे अंगाची लाही लाही होत असताना औरंगाबाद शहरातील पाणी पुरवठा पूर्णत: विस्कळीत झाला आहे. त्यातच बुधवारी जायकवाडीतून पाणी उपसणाऱ्या पंपाची वीज काही वेळ गेल्याने पुरवठा प्रभावित होणार आहे. दरम्यान शहरातील विविध सोसायटय़ांमध्ये टँकरने पाणी विकत घ्यावे लागत आहे. दरम्यान औद्योगिक वसाहतीला पाणी पुरवठा करणाऱ्या जलवाहिनीतून टँकर भरण्याचे आदेश पालकमंत्री सुभाष देसाई यांनी दिले. त्यानंतर १६ टँकरने पाणी वितरण केले जाणार आहे. शहरातील विविध भागात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनू लागला आहे.
दरम्यान औरंगाबाद शहराच्या पाणीपुरवठा योजनेसाठी जलवाहिनी तयार करण्याचे कामही आता वेगात सुरू करण्यात आल्याचा दावा केला जात आहे. महापालिकेचे आयुक्त अस्तिककुमार पांडेय यांनी या योजनेचा समावेश केंद्राच्या अमृत- २ या योजनेत व्हावा असे प्रयत्न सुरू केले आहेत. शहरातील खासगी टँकरदरातही आता मोठी वाढ करण्यात आली असून पाच हजार लिटरच्या टँकरला ८०० ते एक हजार रुपये आकारले जात आहेत. त्यामुळे शहरातील पाण्यावरील खर्चात मोठी वाढ झाली आहे. प्रत्येक कुटुंबास जवळपास दोन हजार रुपयांपर्यंतचा पाणी खर्च स्वतंत्रपणे करावा लागत आहे.
दरम्यान मंजूर योजनेला गती देण्यासाठी प्रयत्न सुरूच आहेत. पण हा उन्हाळा औरंगाबादकरांना टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे. पिण्याच्या पाण्याच्या मोठय़ा बाटल्यांच्या दरातही वाढ करण्यात आली असून आता बाटलीसाठी लागणारी अनामत रक्कम २०० रुपयांवरून ३०० रुपये करण्यात आली आहे. पिण्याच्या पाण्यासाठी जार आणि वापराच्या पाण्यासाठी टँकर असे चित्र शहरभर दिसून येत आहे.
0 टिप्पण्या