केवळ २७ मशिदींनाच परवानगी

 


आंदोलनानंतरही सांगली जिल्ह्यातील २९१ मशिदींची भोंगा परवानगीकडे पाठ ;२०४ अर्ज 

सांगली : मशिदीवरचे बेकायदा भोंगे उतरवण्यासाठी मनसेकडून सुरू केलेल्या आंदोलनानंतरही सांगली जिल्ह्यातील ४९५ पैकी २९१ मशिदींनी परवानगीसाठी अद्याप अर्जही केलेला नसल्याचे समोर आले आहे. आजपर्यंत केवळ २०४ मशिदींनीच ध्वनिवर्धक वापराच्या परवान्यासाठी अर्ज केले आहेत. यातही केवळ २७ मशिदींना नियमांच्या आधारे न्यायालयीन आदेशानुसार ध्वनिवर्धक वापरण्यास परवानगी देण्यात आल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी शुक्रवारी दिली.

मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी जाहीर केलेल्या आंदोलनानंतर राज्यात सर्वत्र मशिदींवरचे भोंगे हा चर्चेचा विषय झाला आहे. यातील किती मशिदींवरील भोंग्यांना परवानगी आहे, त्याबाबतची चौकशी सध्या सुरू झाली आहे.

याबाबत पोलीस प्रशासनाकडूनही परवानगी घेऊनच प्रार्थनास्थळावर भोंगे लावण्याचे आवाहन केले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अशी परवानगी न घेता कुणी ध्वनिवर्धक लावल्यास त्यावर कारवाई करण्याचे संकेत देण्यात आलेले आहेत.

या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात अनेक मशिदींच्या विश्वस्तांकडून अशी परवानगी घेण्याचे काम सुरू झाले आहे.

सांगली जिल्ह्यात एकूण ५०८ मशिदी असून त्यातील ४९५ मशिदींवर ध्वनिवर्धकांचा वापर करण्यात येत आहे. १३ मशिदींनी ध्वनिवर्धक लावले नाहीत. धार्मिक स्थळावर रितसर परवानगी घेऊनच ध्वनिवर्धक वापरण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

दरम्यान ४ मे रोजी सुरू झालेल्या या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील मशिदींवरील भोंग्याची परवानगी तपासणीची कारवाई सुरू झाली आहे. या परवानगीसाठी आतापर्यंत २०४ मशिदींनी परवान्यासाठी अर्ज केले आहेत. यातील २७ मशिदींना ध्वनिमर्यादा पाळण्याचे बंधन आणि अन्य कायदेशीर बाबींच्या तपासणीनंतर अशी ध्वनिवर्धक यंत्रणा वापरण्यास परवानगी देण्यात आली आहे. यातील धक्कादायक बाब अशी की अर्ज केलेल्यांपैकी १७७ अर्ज अद्याप काही त्रुटींमुळे प्रलंबित आहेत. तर दुसरीकडे २९१ मशिदींनी अद्याप अशा परवानगीसाठी अर्जही केलेला नसल्याचे समोर आले आहे.

दरम्यान काही मशिदींनी परवानगी न काढता त्यांच्याकडे असलेली ध्वनिवर्धक यंत्रणा यापुढे बंद ठेवतच यापुढे अजान देण्याचे ठरवले असल्याचे सांगितले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या