समाजमाध्यमे ही दुधारी शस्त्रे – अजित पवार


पुणे :
वेगाने माहिती प्रसारित करणारी समाजमाध्यमे ही दुधारी शस्त्र आहेत. मात्र, प्रसारित होणाऱ्या माहितीबाबत खात्री करून  घेण्याची यंत्रणा अस्तित्वात नसल्याने गैरसमजच अधिक होतात. परतीच्या पावसाप्रमाणे झोडपून काढत असल्याने समाजमाध्यमे ही आता डोकेदुखी झाली आहेत, असे मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी व्यक्त केले. डिजीटल आणि समाजमाध्यमांना वळण आणि शिस्त लावण्यासाठी कायद्याच्या चौकटीत बसविण्याची वेळ आली आहे, असेही ते म्हणाले.


पत्रकार वरुणराज भिडे मित्र मंडळाच्या वतीने अजित पवार यांच्या हस्ते ’लोकसत्ता’चे राजकीय संपादक संतोष प्रधान यांना वरुणराज भिडे पुरस्कार प्रदान करण्यात आला. तर, ’सामना’च्या मेधा पुंडे-पालकर, ’टाइम्स ऑफ इंडिया’च्या अलका धूपकर, ’महाराष्ट्र टाइम्स’चे जुन्नर येथील प्रतिनिधी धर्मेद्र कोरे आणि ‘एबीपी माझा’चे उस्मानाबाद येथील प्रतिनिधी राहुल कुलकर्णी यांना आश्वासक पत्रकार पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्याप्रसंगी अजित पवार बोलत होते. ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. मंडळाचे अध्यक्ष उल्हास पवार, विश्वस्त अंकुश काकडे आणि डॉ. सतीश देसाई या वेळी उपस्थित होते. पवार म्हणाले की, महाराष्ट्रातील ऐक्य आणि सलोखा टिकून राहण्यासाठी माध्यमांनी नको त्या मुद्दय़ाला अनावश्यक महत्त्व देणे माध्यमांनी फोटोथांबवले पाहिजे. त्यामुळे जातीय ध्रुवीकरण करून भीतीचे वातावरण निर्माण होणार नाही यासाठी समाजमाध्यमांनी बातमी प्रसारित करण्याआधी शहानिशा करणे गरजेचे आहे. मुद्रित माध्यमे, इलेक्ट्रॉनिक प्रसार माध्यमे आणि आता समाज माध्यमे असे स्थित्यंतर होत असताना पत्रकारितेची मूल्ये हरवणार नाहीत याची दक्षता घेतली गेली पाहिजे.

भावे  म्हणाले की, सर्वसामान्यांचे प्रश्न बाजूला पडले असून राजकीय पक्ष केवळ आरोप-प्रत्यारोपांमध्येच व्यग्र आहेत आणि ती भांडणे दाखविण्यात माध्यमे गुंतून पडली आहेत.

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान पुणे केंद्रातर्फे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या आणि संज्ञापन अभ्यासक्रमात प्रथम आलेला रोहित वाळिंबे आणि चालू घडामोडी या विषयात प्रथम आलेला आतीत शेख या विद्यार्थ्यांना अजित पवार यांच्या हस्ते शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली.

रिकामटेकडय़ांना प्रसिद्धी देऊ नका


समाजाच्या ध्रुवीकरणाचा होत असलेला प्रयत्न माध्यमांनी समाजामोर आणला पाहिजे. रिकामटेकडय़ांना प्रसिद्धी देऊ नये, अशा शब्दांत अजित पवार यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा नामोल्लेख टाळून माध्यमांकडून अपेक्षा व्यक्त केली.

भिडे यांच्या मार्गदर्शनाचा लाभ

पत्रकार म्हणून काम करताना वरुणराज भिडे यांच्या मार्गदर्शनाचा मला लाभ झाला, अशी कृतज्ञता व्यक्त करून संतोष प्रधान यांनी भिडे यांच्या आठवणींना उजाळा दिला. प्रधान म्हणाले, राज्याच्या निवडणुकीसाठी २८८ उमेदवारांची घोषणा झाली. या यादीमध्ये कोणकोणत्या आडणावाचे किती उमेदवार आहेत याचा अभ्यास कर, असे त्यांनी मला सांगितले होते. त्याच धर्तीवर भिडे यांनी त्यावेळी केलेली बातमी गाजली होती. मी ठाण्याला रहात असल्याने वसई येथील निवडणुकीचे वार्ताकन तू कर, असे सांगून त्यांनी मला प्रोत्साहन दिले होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या