म्हाडा पेपरफुटी प्रकरणाचे कनेक्‍शन जळगावपर्यंत

 


पुणे- 


म्हाडा पेपरफुटी प्रकरणाचे कनेक्‍शन आता जळगावपर्यंत पोहोचले आहे. उमेदवारांना “प्लेसमेंट एजन्सी’तून फोन करून, “आपल्याला म्हाडा परीक्षेमध्ये नोकरीचे काम करायचे असल्यास ऑफिसला येऊन भेटा’ असे सांगितले जात होते.

ही बाब समोर आल्यावर “प्लेसमेंट एजन्सी’च्या संचालक वकिलाला गुरुवारी सायबर पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने एक जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

विजय बाबूलाल दर्जी (रा. जळगांव) असे अटक केलेल्या वकिलाचे नाव आहे. या प्रकरणात “जी. ए. सॉफ्टवेअर टेक्‍नॉलॉजी’ कंपनीचा संचालक डॉ. प्रीतिश देशमुख, एजंट संतोष हरकळ व अंकुश हरकळ यांच्यासह बारा जणांना अटक करण्यात आली आहे. त्याबाबत म्हाडाचे सीईओ नितीन माने यांनी सायबर पोलिसांत तक्रार दिली होती.

विजय दर्जी याची “बालाजी प्लेसमेंट एजन्सी’ आहे. त्याने “म्हाडा’ विभागाच्या परीक्षेला संपर्क साधल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. त्याने एका उमेदवाराचे म्हाडा परीक्षेचे आणि एका उमेदवाराचे आरोग्य विभागाच्या परीक्षेचे हॉलतिकीट आरोपी राजेंद्र सानप याला पाठवले होते. दरम्यान, याबाबत संबंधित टेलिकॉलर असलेल्या कर्मचारी महिलेने जबाब नोंदवल्याची माहिती सहायक सरकारी वकील विजयसिंह जाधव यांनी न्यायालयात दिली. या प्रकरणाच्या अधिक तपासासाठी आरोपीला पोलीस कोठडी देण्यात यावी, अशी मागणी सरकारी वकील जाधव यांनी केली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या