अजित पवारांनी राज ठाकरेंना सुनावलं; म्हणाले “असं अल्टिमेटम…”
सरळ सांगून भोंगे निघणार नसतील तर मग होऊन जाऊ द्या, एकदा अशी आक्रमक भाषा वापरत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दुप्पट आवाजात मशीदींसमोर हनुमान चालिसा वाजविण्याची भूमिका जाहीर केली आहे. औरंगाबाद येथील सभेत राज यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली. केवळ महाराष्ट्रात नाही तर देशातील भोंगे हटविले पाहिजेत असे बजावताना, सरळ सांगून करत नसतील त्यांना आता एकदा महाराष्ट्राच्या मनगटात काय ताकद आहे, हे दाखवूनच द्या असं आव्हान दिलं. दरम्यान राज ठाकरेंच्या या भाषणावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी टीका केली आहे. ते नाशिकमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
महाराष्ट्रात काम करताना कोणीही अल्टिमेटम देऊ शकत नाही. कायद्याचं राज्य आहे, हुकुमशाही चालणार नाही अशा शब्दात अजित पवार यांनी राज ठाकरेंना खडसावलं आहे. राज ठाकरे कोणत्या काळात भाषण करतात त्यावर त्यांचा सूर अवलंबून असतो अशी टीकाही अजित पवार यांनी केली आहे.
“महाराष्ट्रात काम करत असताना कोणीही असं अल्टिमेटम देऊ शकत नाही. हे कायद्याचं राज्य आहे. इथे कोणाचीही हुकुमशाही चालणार नाही. जर कोणाला असं वाटत असेल की मी असं म्हटलं तर तसं होईल तर ते चालणार नाही. मग अजित पवारनेही हुकुमशाही केलेली चालणार नाही,” असं अजित पवार म्हणाले आहेत.
“कायद्याने, संविधानाने, नियमाने ज्या काही गोष्टी सांगितल्या आहेत त्याचं पालन सर्वांनाच करावं लागेल. सर्व पक्षाच्या नेत्यांना नागरिकांना, ग्रामस्थांना करावा लागेल,” असं अजित पवारांनी सांगितलं.
“राज ठाकरे कोणत्या काळात भाषण करतात यावर त्यांचा सूर अवलंबून असतो. लोकसभा निवडणुकीच्या आधी जी भाषणं झाली ती भाजपाच्या विरोधात होती. नंतरच्या काळात अशा काही गोष्टी घडल्या आणि त्यांचं मन व मतपरिवर्तन झालं. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी, आघाडी, महाविकास आघाडी, शिवसेना यांच्यावर टीका करण्यास सुरुवात केली आहे,” अशी टीका अजित पवारांनी केली.
0 टिप्पण्या