वसंत मोरेंनी स्पष्टच सांगितलं
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे याबाबत आंदोलन पुकारले असून त्या आंदोलनात मनसेचे शहर अध्यक्ष साईनाथ बाबर आणि वसंत मोरे कुठेच दिसले नाही. त्यावर साईनाथ बाबर यांनी कालच भूमिका मांडली. तर वसंत मोरे हे देखील आंदोलनात दिसले नव्हते, पण कालपासून त्याचं स्टेटस चर्चेत होतं, त्यावर त्यांनी प्रसारमाध्यमांसमोर येऊन भूमिका मांडली.
माझा रस्ता चुकतोय, असं काही नाही. मला स्वामी विवेकानंद आवडतात. तुम्ही शेवटची वाक्ये घेतली पण पहिली वाक्ये घेतली नाहीत. ज्यावेळेस तुमचा संघर्ष होत असतो, तुमच्या मागे कोणीतरी बोलतं, अडचणी येतात, तेव्हा तुम्ही असं समजयाचं की योग्य मार्गावर आहात. तुम्ही त्यातलं रस्ता बदलाल हे वाक्य घेतलं. पण मी राज मार्गावर आहे आणि राज मार्गावरच राहील,” अशी भूमिका मनसेचे नेते वसंत मोरे यांनी मांडली.
वसंत मोरे म्हणाले, “मी गेली १७ ते १८ वर्ष कायम अक्षय्य तृतीयेच्या दिवशी तिरुपती बालाजी येथे दर्शनाला जातो. तो माझा पूर्वनियोजित कार्यक्रम होता. मी आजवर प्रत्येक निवडणुकीनंतर तिरुपती बालाजी इथे दर्शनाला जात आलो आहे. जर निवडणूक झाली तर मला यश मिळणार, हे निश्चित मनात ठेवले होते. त्यामुळे मी तिरुपतीचे बुकिंग करून ठेवले होते आणि निवडणूक झाली नाही, परंतु नियोजित असल्याने मी तिरुपतीला गेलो.”
दरम्यान, “मनसेचे सर्व नेते माझ्या संपर्कात होते. पण मी कार्यक्रम रद्द केला नाही. कारण याआधी ठाण्याच्या सभेला मला राज साहेबांनी बोलावल्यावर मी गेलो होतो. त्यावेळी माझ्या मोठ्या भावाच्या मुलाचे लग्न होते. त्या सभेच्या दिवशी हळदीचा कार्यक्रम होता. मी माझा घरचा कार्यक्रम रद्द केला आणि ठाण्याच्या सभेला गेलो. मी जर ठाण्यातील सभेला गेलो नाही, तर कार्यकर्त्यामध्ये खूप गैरसमज निर्माण होतील, अशी घरच्या मंडळीची समजूत काढली आणि सभेला गेलो,” असं मोरे यांनी सांगितलं.
“मी माझ्या भागातील मुस्लीम बांधवाना जे आवाहन केले होते. त्यानुसार पहिल्यापासून अजानचा आवाज बंद केलेला आहे. सकाळची आजन भोंग्यांवर होत नाही. तसेच शहरात आरती भोंग्यावर होते. पण मी उपनगरात येतो म्हणून या गोष्टी माझ्याकडे येत नाही,” असं वसंत मोरे म्हणाले.
0 टिप्पण्या