भाषणांची पोलिसांकडून तपासणी


औरंगाबाद :
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्यासह त्यांच्या पक्षाच्या इतर काही नेत्यांनी १ मे रोजी व्यासपीठावरून जे वक्तव्य केले ते चिथावणीखोर आहे किंवा त्यातून सभेसाठी घालून दिलेल्या नियम, अटींचे उल्लंघन झाले किंवा नाही, याची पोलिसांकडून तपासणी सुरू असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

औरंगाबाद येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांची १ मे रोजी येथील मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर मोठी सभा झाली. या सभेला राज ठाकरे यांच्यासह बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, प्रकाश महाजन, सुमित खांबेकर आदींसह अनेक नेत्यांनी संबोधित केले होते. या सभेमध्ये धर्म, जातीचा जाहीरपणे उल्लेख करण्यात आला होता. सभेसाठी पोलीस आयुक्तालयाकडून १६ अटी व नियमांनुसार परवानगी देण्यात आली होती. ९ व्या क्रमांकाच्या अटीमध्ये सभेदरम्यान वंश, जात, भाषा, वर्ण, प्रदेश, जन्मस्थान, धर्म आदी किंवा ते पाळत असणाऱ्या प्रथा-परंपरा यावरून कोणत्याही व्यक्ती व समुदायाचा अपमान होणार नाही, अगर त्याविरुद्ध चिथावणी दिली जाणार नाही, अशी कृती, वक्तव्ये, घोषणाबाजी कोणीही करणार नाही, याची आयोजक व वक्त्यांनी कटाक्षाने दक्षता घ्यावी, असे नमूद केलेले आहे. मात्र, यातील अनेक बाबींचा मनसेच्या नेत्यांच्या भाषणात उल्लेख झालेला होता. याबाबत मनसे नेत्यांच्या भाषणांची तपासणी करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. 

नोटिसा अद्याप नाहीत

औरंगाबाद पोलिसांकडून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांना अद्याप नोटिसा वगैरे काही पाठवण्यात आलेल्या नाहीत, अशी माहिती पोलीस उपायुक्त अपर्णा गिते यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना दिली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या