अपहृत मुलीच्या नातेवाईकांना पोलिसांकडून मारहाण


न्यायालयात फिर्याद, पोलीस उपनिरीक्षक मारहाण प्रकरणी तिघांना न्यायालयीन कोठडी

श्रीरामपूर : अपहृत मुलीच्या तपासात पोलिसांनी दिरंगाई केली आणि मुलगी सापडल्यानंतरही तिची वैद्यकीय तपासणी करण्याची मगणी केली असता तिच्या नातेवाईकांना शिवीगाळ व मारहाण करण्यात आली. त्यामुळे चिडलेल्या नातेवाईकांनी तपास अधिकारी पोलिस उपनिरीक्षक समाधान सुरवडे यांना मारहण केली. याप्रकरणी पोलिसांनी मुलीच्या तीन नातेवाईकांवर दाखल केलेल्या गुन्ह्याची शुक्रवारी सुनावणी झाली. पोलिस कोठडीची मागणी फेटाळून न्यायालयाने आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावली. दरम्यान, मुलीच्या नात्यातील महिलेच्या फिर्यादीवरून श्रीरामपूर पोलिसांविरुद्धही न्यायालयात फिर्याद दाखल करण्यात आली. 

मुलीच्या नात्यातील मुंबई येथे राहणार्‍या महिलेने न्यायालयात दिलेल्या फिर्यादीनुसार, तीन महिन्यांपुर्वी 12 फेबु्रवारी 2022 रोजी तालुक्यातील अशोकनगर परिसरातून 16 वर्षाच्या एका अल्पवयीन मुलीचे अपहरण झाल्याबाबत श्रीरामपूर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास उपनिरीक्षक समाधान सुरवडे हे करीत होते. मुलीचा शोध लागत नसून पोलिस सहकार्य करत नसल्याची तक्रार मुलीच्या नातेवाईकांनी केली होती. याप्रकरणी 5 मे रोजी त्यांनी पोलिस अधिक्षकांना उषोषणाबाबतचे पत्र दिले होते. त्यानंतर उपनिरीक्षक सुरवडे यांनी मुलीच्या नातेवाईकांना अपमानास्पद वागणूक दिल्याची तक्रार आहे. 10 मे रोजी अपहरण झालेल्या मुलीचा तिच्या आजोबांना फोन आला आणि आपण पुण्यात असल्याने तिने त्यांना सांगितले. आनंद गाडेकर (रा, दौंड, जि. पुणे) याने आपल्याला पळवून आणल्याचे तिने सांगितले मात्र पुण्यातील कोणत्या परिसरात आहे, हे तिला सांगता आले नाही. मुलीच्या घरच्यांनी याबाबत उपनिरीक्षक सुरवडे यांना माहिती दिली. त्यांनी मोबाईल नंबरवरून शोध सुरू असल्याचे सांगितले. दरम्यान, दुसर्‍या दिवशी उपनिरीक्षक सुरवडे यांनी नातेवाईकांना फोन करून तुमची मुलगी शोधून थकलो, आता तुम्हीच शोधा, असे सांगून फोन कट केला. त्यानंतर सायंकाळी पुन्हा मुलीचा फोन आला आणि तुम्ही पोलिसांना सांगितले का? मला पोलिसांचा फोन आला होता. अशी विचारणा करून रडत तिने फोन कट केला. 

दुसर्‍या दिवशी (दि. 12 मे) सकाळी अपहृत मुलीने आपण शिर्डी येथे असल्याचे सांगून नातेवाईकांना बोलावले. त्यांनी पोलिस उपनिरीक्षक सुरवडे यांना माहिती दिली. पण त्यांनी तुम्हीच शिर्डीला जा, अशी सूचना केली. शिर्डी पोलिसांनी मुलगी शोधण्यासाठी मदत केली. तोपर्यंत आरोपी पसार झाला होता. शिर्डी पोलिसांनी श्रीरामपूरला जाण्याची सूचना केली. त्यानुसार नातेवाईक मुलीला घेऊन श्रीरामपूरकडे येत असताना टिळकनगर फाट्यावर उपनिरीक्षक सुरवडे यांनी मुलीला आपल्या गाडीत बसवून नातेवाईकांना पोलिस ठाण्यात येण्याची सूचना केली. 

श्रीरामपूर शहर पोलिस ठाण्यात आल्यानंतर नातेवाईकांनी आरोपीच्या शोधासाठी पोलिसांनी दिरंगाई केल्याचा आरोप केला. मुलीची वैद्यकीय तपासणी करण्याची मागणी केली. त्यावरून सुरवडे व नातेवाईकांचे वाद व हाणामारी झाली. 

पोलिसांच्या फिर्यादीनुसार, आरोपीस अटक का केली नाही, अशी अरेरावीची भाषा वापरुन तपास सांगण्याची गरज नाही. कायदा शिकऊ नका. तुझ्या विरुध्द वरिष्ठ कार्यालयात अर्ज करून, आत्ता तुझी नोकरीच घालवतो. तुला व तुझ्या साहेबांना खोट्या गुन्ह्यात अडकवतो, अशी धमकी देऊन पोलीस उपनिरीक्षक समाधान सुरवाडे यांच्या अंगावर धावून जात त्यांना जोरदार मारहाण करण्यात आली. यावेळी मध्यस्थीस गेलेल्या दोन पोलीस हेड कॉन्स्टेबल यांनाही मारहाण करून, जखमी करण्यात आले. पोलीस नाईक सोमनाथ गाडेकर, पोलीस शिपाई भारत तमनर, महिला पोलीस शिपाई योगिता निकम, महिला पोलीस शिपाई सरग, ठाणे अंमलदार आलम पटेल, पोकाँ पोपट भोईटे तसेच सुनील मुथ्था व सुभाष जंगले यांनी मध्यस्थी करीत पोलीस कक्षासमोर येऊन त्यांना ताब्यात घेतले. यावेळी पोलीस नाईक गाडेकर त्यांना देखील धक्काबुक्की केल्याने त्यांच्या हातास दुखापत झाली.

याप्रकरणी विजय गुलाब बडी, ओंकार भरत गायकवाड, पवनसिंग केशवसिंग यांच्याविरुद्ध पोलिसांना अरेरावी, बुक्क्यांनी मारहाण करुन सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. उपनिरीक्षक समाधान अशोक सुरवाडे यांनी ही फिर्याद दिली. 

शुक्रवारी तिन्ही आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी रिना रॉय यांच्यापुढे ही सुनावणी झाली. आरोपींच्या पोलिस कोठडीसाठी सरकारी वकील अ‍ॅड. अग्रवाल यांच्यासह स्वतः पोलिस निरीक्षक संजय सानप यांनी जोरदार मागणी केली. आरोपींच्या वतीने अ‍ॅड. अस्लम शेख यांनी युक्तीवाद करून नागरिकांवर पोलिसांनी अन्याय केल्यांनतर न्यायालयातही त्यांना थारा मिळाला नाही, तर समाजात वेगळा संदेश जाईल. सामान्य माणसे विनाकारण पोलिसांना पोलिस ठाण्यात घुसून मारहाण करू शकत नसल्याचा युक्तीवाद केला. न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकल्यानंतर पोलिस कोठडी नाकारून तिन्ही आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. 

दरम्यान, मुलीच्या नात्यातील एका महिलेने पोलिसांविरुद्ध अपहरण करणार्‍या आरोपीस मदत करणे, मुलीच्या शोधास व वैद्यकीय तपासणी करण्यास टाळाटाळ करणे, विचारणा केली असता अपमानास्पद वागणूक देऊन महिला, पुरूषांना मारहण केल्याची न्यायालयात खाजगी फिर्याद दिली आहे. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या