“ज्यांना जनमानसात आधार नाही असे लोक काहीतरी वेगळी भूमिका घेऊन समाजात संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करतात,” या शब्दांमध्ये भोंग्याचा सुरु असणाऱ्या विषयाच्या आधारे राष्ट्रावादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी विरोधकांना सुनावले आहे. साताऱ्यातील भारतीय भटके विमुक्त विकास व संशोधन संस्थेने सोमवारी आयोजित केलेल्या पुरस्कार प्रदान सोहळ्याला उपस्थित राहिल्यानंतर पवार यांनी माध्यम प्रतिनिधीनी संवाद साधला. यावेळी राज ठाकरे व भाजपावर टीकेची झोड उठवली.
‘ज्यांनी मला जातीयवादी म्हणून हिणवत विनोदी वक्तव्य केले, त्यांच्या विनोदाचा मी आस्वाद घेतो. अशाप्रकारची वक्तव्य केल्यास लोक हसतात, लोक अशा वक्तव्यांना गांभीर्याने घेत नाहीत,’ अशा शब्दात पवार यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा नामोल्लेख टाळून निशाणा साधला. ओबीसी आरक्षणाविनाच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत आहेत. याबाबत विचारले असता ते म्हणाले, “ओबीसी आरक्षण मार्ग कसा काढायचा यासाठी मुख्यमंत्री आणि मंत्री मंडळ प्रयत्न करत आहेत.सर्वांना मान्य होईल असा तोडगा काढण्याचा प्रयत्न सुरु आहे.”
“भाजपाला सत्ता आपल्या हातात ठेवण्याची अस्वस्थता आहे. त्यामुळे सकाळ, दुपार, संध्याकाळी महाविकास आघाडीवर टीका करतात. जेवढे आघाडी सरकार पुढे जाईल तसतसे भाजपाचे अनेक मुद्दे मागे पडलेले दिसतील,” असे सांगताना भोंगा हा काय मुद्दा असू शकत नाही, अशी भूमिका पवार यांनी स्पष्ट केली. “ज्यांच्याकडे काही नाही ते असं काही तरी बोलत असतात, अशा वक्तव्यांना लोक गांभीर्याने घेत नाहीत,” असेही पवारांनी स्पष्ट केले.
0 टिप्पण्या