राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविरोधात फेसबुकवर हिणकस मजकूर प्रसारित करणारी टिव्ही मालिकांमधील अभिनेत्री केतकी चितळे हिला रविवारी ठाणे न्यायालयाने १८ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. असं असतानाच या प्रकरणावरुन राजकीय आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहे. अशआछ आता या वादामध्ये भूमाता ब्रिग्रेडच्या तृप्ती देसाईंनी उडी घेतलीय. देसाईंनी केतकीचं समर्थन केलंय. केतकीच्या पोस्टमध्ये थेट नाव घेण्यात आलेलं नाही असं सांगताना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांवरही कारवाई करा अशी मागणी तृप्ती देसाईंनी केलीय.
तुम्ही केतकी चितळेला तुम्ही पाठिंबा देताना दिसताय, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता तृप्ती देसाईंनी केतकी चितळेच्या पोस्टमध्ये शरद पवार असा थेट उल्लेख नसल्याचं म्हटलंय. “केतकी चितळेने जी आक्षेपार्ह पोस्ट टाकली त्यामध्ये पवार असा उल्लेख होता. शरद पवार असं पूर्ण नाव लिहिलेलं नाही. त्यामुळे ते नेमकं शरद पवारांबद्दलचं बोललं या या विषयावर कदाचित न्यायालयामध्ये ही केस टिकू शकणार नाही,” असं तृप्ती देसाई म्हणाल्यात. तृप्ती यांनी प्रसारमाध्यमांसाठी जारी केलेल्या व्हिडीओतून ही टीका केली आहे.
“अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या अधिकार प्रत्येकाला आहे. प्रत्येकाला मत मांडण्याचं स्वातंत्र्य आहे. तिने जर जाणूनबुजून पवारांविरोधात लिहिलं असेल तर तिच्यावर कारवाई झाली पाहिजे. पण ज्या पद्धतीने राष्ट्रवादीचे कार्यकर्ते तिला विरोध करतायत, तिला ट्रोलिंग करतायत, तिचे आक्षेपार्ह फोटो टाकतायत, शिवागाळ करतायत मग त्या कारवाई का होत नाही?,” असा प्रश्न तृप्ती देसाईंनी विचारलाय.
“केतकीला अटक झाली तेव्हा आक्षेपार्ह पोस्ट लिहिल्याबद्दल केली. नंतर तिच्यावर विविध कलम लावले गेले कायदा सुव्यवस्थाचा प्रश्न कोण बिघडवतयं. पवारांचे समर्थकच बिघडवतायत. म्हणून एखाद्या महिलेला टार्गेट केलं जात असेल, कलमं लावली जात असेल तर नक्कीच ते चुकीचं आहे. आम्ही त्याचा निषेध केलाय. जे कोणी केतकी चितळेबद्दल अशा घाणेरड्या कमेंट करतायत त्यांच्यावर सुद्धा गुन्हे दाखल करुन त्यांना तातडीने अटक करावी, अशी आमची मुख्यमंत्र्यांकडे मागणीय,” असंही तृप्ती यांनी म्हटलंय.
“अटक झालीय ती एफआयआर दाखल झाल्यावर झालीय. वेगवेगळे कलम लावल्याने तिला पोलीस कोठडी सुनावण्यात आलीय. तिला अडकवण्यासाठी वेगवेगळे कलम लावणं, ही कुठल्या पक्षाची परंपरा आहे? कायदा सगळ्यांना समान आहे. आमच्यावरही अनेकदा आक्षेपार्ह पोस्ट केलं गेलं. आमचंही ट्रोलिंग केलं गेलं. आम्ही गुन्हे दाखल केलेत. कधीही कुणाला अटक केली नाही. म्हणजे विशिष्ट नेत्यावरच पोस्ट टाकल्यावर तुम्ही आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याबद्दल आरोपींना अटक होते का? त्यांना वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये अडकवलं जातं का?,” असे प्रश्न तृप्ती देसाईंनी उपस्थित केलेत.
“कायदा समान असताना, आमच्या सारख्या कार्यकर्त्यांना आणि सर्वसामान्य लोकांना वेगळा न्याय आहे का? आपल्या राज्यात हा जो काही भेदभाव चालेला आहे तो चुकीचा आहे. केतकी चितळेला पाठिंबा दिल्यावर सगळे जातीवर येतात,” अशी खंतही तृप्ती यांनी व्यक्त केलीय. “ट्रोलिंग करण्याचा प्रयत्न करता. अनेकजण म्हणतात त्या चितळे आहेत तुम्ही देसाई आहात. त्या ब्राह्मणआहेत तुम्ही ब्राह्मण आहात म्हणून तुम्ही सपोर्ट करताय. म्हणून मी सोशल मीडियावर लोकांना सांगितलं की मी ब्राम्हण मुळीच नाही. मी ९६ कुळी मराठा आहे. मी ज्या ९६ कुळी मराठ्यांच्या घरातून येते तिथे मला सर्वधर्म समभावाचा आणि परखड मत मांडण्याचा अधिकार आणि संस्कार दिलेत, म्हणून मी माझं मत मांडलं आहे. केतकी चितळेचा अटक केलीय, तिच्यावर वेगवेगळे कलम लावलेत मग तुमच्या समर्थकांवरही तसेच गुन्हे दाखल करा,” अशी मागणी तृप्ती यांनी केलीय.
0 टिप्पण्या