राज्यसभेच्या उमेदवारीकरिता कोल्हापूरचे छत्रपती संभाजीराजे यांनी शिवसेनेत प्रवेश करावा अशी अट घालण्यात आली आहे. मात्र शिवसेनेत प्रवेश करण्यासाठी संभाजीराजे अनुकूल नाहीत. महाविकास आघाडी म्हणून पाठिंबा द्यावा, अशी भूमिका त्यांनी मांडली आहे. दरम्यान दुपारी १२ वाजता होणाऱ्या बैठकीआधीच संभाजीराजे कोल्हापूरला रवाना झाले आहेत. त्यामुळे संभाजीराजेंनी शिवसेनेच्या पक्ष प्रवेशासाठी दिलेल्या निमंत्रणाकडे पाठ फिरवल्याची चर्चा रंगली आहे.
शिवसेनेकडून संभाजीराजेंना पक्ष प्रवेशाचं निमंत्रण देण्यात आलं होतं. संभाजीराजे आज दुपारी १२ वाजता वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार होते. पण संभाजीराजे यांनी कोल्हापूरकडे रवाना झाले असून भेट टाळली आहे. त्यामुळे ते शिवसेनेत प्रवेश कऱणार नसल्याचं बोललं जात आहे.
राज्यसभेची निवडणूक अपक्ष म्हणून लढविण्याचे जाहीर केलेले कोल्हापूरचे संभाजीराजे यांनी सोमवारी शिवसेनेत प्रवेश करावा. त्यांना शिवसेनेकडून राज्यसभेची उमेदवारी दिली जाईल, असे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सांगितले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा निरोप संभाजीराजे यांना देण्यात आला होता. शिवसेनेच्या एका मंत्र्याने संभाजीराजे यांची भेटही घेतली. संभाजीराजे हे शिवसेनेत प्रवेश करण्यास तयार नाहीत. याउलट महाविकास आघाडीकडील अतिरिक्त मते आपल्याला द्यावीत, असा प्रस्ताव त्यांनी शिवसेना व राष्ट्रवादीकडे दिला आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत ही ३१ तारखेपर्यंत आहे.
राज्यसभेच्या सहापैकी दोन जागा लढविण्याचे शिवसेनेने जाहीर केले आहे. एका जागेवर संजय राऊत यांची उमेदवारी निश्चित मानली जाते. भाजपाच्या वतीने सहा वर्षांपूर्वी राज्यसभेवर संभाजीराजे यांची नामनियुक्त सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. तेव्हाही संभाजीराजे यांनी अपक्ष म्हणूनच सहा वर्षे खासदारकी भूषविली. या वेळीही त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढण्याची तयारी केली आहे. पण अपक्ष लढल्यास विजयाचे गणित जुळणे अशक्य आहे. भाजपाकडे २२ अतिरिक्त मते असली तरी अतिरिक्त २० मते मिळविण्याचे त्यांच्यापुढे आव्हान असेल.
0 टिप्पण्या