वॉर्नर-पॉवेलपुढे हैदराबाद निष्प्रभ!
मुंबई : ‘आयपीएल’च्या गेल्या हंगामात सनरायजर्स हैदराबादनी डेव्हिड वॉर्नरची कर्णधारपदावरून हकालपट्टी केली होती. तसेच अखेरच्या काही सामन्यांत त्याला संघाबाहेरही ठेवले. वॉर्नरने या वागणुकीची अखेर परतफेड केली. सलामीवीर वॉर्नर (५८ चेंडूंत नाबाद ९२ धावा) आणि रोव्हमन पॉवेल (३५ चेंडूंत ६७ धावा) यांच्या अर्धशतकांच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्सनी गुरुवारी हैदराबादवर २१ धावांनी मात केली.
मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात दिल्लीने दिलेल्या २०८ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबादला २० षटकांत ८ बाद १८६ धावाच करता आल्या. या विजयासह दिल्लीने (१० सामन्यांत १० गुण) हैदराबादला मागे टाकत गुणतालिकेत पाचवे स्थान मिळवले. आव्हानाचा पाठलाग करताना आघाडीच्या फळीतील फलंदाज अपयशी ठरल्यानंतर निकोलस पूरन (३४ चेंडूंत ६२) आणि एडिन मार्करम (२५ चेंडूंत ४२) यांनी हैदराबादचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना इतरांची साथ न लाभल्याने हैदराबादला सलग तिसरा पराभव पत्करावा लागला.
तत्पूर्वी, दिल्लीने प्रथम फलंदाजी करताना ३ बाद २०७ अशी धावसंख्या उभारली. पृथ्वी शॉच्या अनुपस्थितीत सलामीला आलेल्या मनदीप सिंगला (०) पहिल्याच षटकात भुवनेश्वर कुमारने माघारी धाडले. मिचेल मार्शही (१०) लवकर बाद झाला. कर्णधार ऋषभ पंतने लेग-स्पिनर श्रेयस गोपाळच्या एकाच षटकात सलग तीन षटकार आणि एका चौकाराची आतषबाजी केली; पण याच षटकात तो २६ धावांवर (१६ चेंडू) बाद झाला. यानंतर मात्र वॉर्नर आणि पॉवेल यांनी चौथ्या गडय़ासाठी अवघ्या ६६ चेंडूंत १२२ धावांची भागीदारी रचत दिल्लीला मोठी धावसंख्या उभारून दिली.
संक्षिप्त धावफलक
दिल्ली कॅपिटल्स : २० षटकांत ३ बाद २०७ (डेव्हिड वॉर्नर नाबाद ९२, रोव्हमन पॉवेल नाबाद ६७; भुवनेश्वर कुमार १/२५) विजयी वि. सनरायजर्स हैदराबाद : २० षटकांत ८ बाद १८६ (निकोलस पूरन ६२; खलील अहमद ३/३०)
उमरानचा तेजतर्रार मारा
हैदराबादच्या उमरान मलिकने यंदाच्या हंगामात आपल्या तेजतर्रार माऱ्याने सर्वाचे लक्ष वेधून घेतले आहे. दिल्लीविरुद्धच्या सामन्यात त्याने चार षटकांत ५२ धावा दिल्या. मात्र, या सामन्यातही त्याने सातत्याने ताशी १५० प्रति किमीच्या वेगाने गोलंदाजी केल्याचे पाहायला मिळाले. त्यातच उमरानने दिल्लीच्या डावातील अखेरच्या षटकातील चौथा चेंडू ताशी १५७ प्रति किमीच्या गतीने टाकला. हा ‘आयपीएल’च्या इतिहासातील दुसरा सर्वात वेगवान चेंडू ठरला. सर्वात जलद चेंडूचा विक्रम शॉन टेटच्या नावे असून त्याने २०११च्या हंगामात १५७.७१च्या गतीने चेंडू टाकला होता.
0 टिप्पण्या