भाजपच्या माजी नगरसेविकाने ऐतिहासिक महात्मा फुले वाड्याच्या कमानीवर स्वतःच्या सासूच्या नावाचा फलक लावल्याची धक्कदायक घटना घडली
पुणे-
नगरसेवकांनी संकल्पनेच्या नावाखाली चमकोगिरी सुरू केली असताना आता तर थेट कहरच केला आहे. भाजपच्या माजी नगरसेविकाने ऐतिहासिक महात्मा फुले वाड्याच्या कमानीवर स्वतःच्या सासूच्या नावाचा फलक लावल्याची धक्कदायक घटना घडली आहे.
हा फलक २४ मे रोजी लावला असल्याचा दावा संघटनांनी केला आहे. मात्र या प्रकाराबाबत प्रशासन आंधारात आहे.
पुणे शहरात नगरसेवकांनी विविध प्रकारचे शिल्प, पुतळे उभारले आहेत. पादचारी मार्ग, रस्ते आडवून स्मारक तयार केले आहेत. तसेच चौकांचे सुशोभिकरण केले आहे. त्या प्रत्येक ठिकाणी संकल्पना म्हणून संबंधित नगरसेवकांचे नाव मोठ्या अक्षरात लिहिण्यात आले आहे.गेल्या पाच वर्षात या चमकोगिरीसाठी कोट्यावधी रुपये खर्च झालेले आहेत.
पुणे महापालिकेच्या नगरसेवकांची १४ मार्च रोजी मुदत संपली मात्र असे असले तरी स्वतःच्या नावाने बोर्ड लावण्याचा प्रकार सुरूच आहे. त्यातच आता भाजपच्या माजी नगरसेविका विजयालक्ष्मी हिरहर यांच्या सासू 'कै. लक्ष्मीबाई नारायणराव हरिहर' यांच्या नावाचा फलक ऐतिहासीक महात्मा फुले वाड्याच्या मुख्य प्रवेशद्वारावर लावण्यात आला आहे. त्याखाली मार्गदर्शक म्हणून खासदार गिरीश बापट, आमदार मुक्ता टिळक यांचे नाव आहे. नगरसेविकेच्या सासूचे नाव फुले वाड्यावर लावण्यात आल्याने त्यावर महात्मा फुले मंडळ, ज्योती मित्र मंडळ, अखिल भारतीय माळी समाज प्रबोधन व शिक्षण संस्था यांनी आक्षेप घेतला आहे. याविरोधात महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडे तक्रार देखील करण्यात आली आहे.
या प्रकरणी माजी महापौर मुरलीधर मोहोळ म्हणाले की, या कमानीच्या सुभोभिकरणासाठी महापौर निधी देण्यात आला आहे. पण त्याठिकाणी संकल्पना म्हणून माझे नाव मी लावलेले नाही व तसे सांगितलेलेही नाही. स्थानिक नगरसेवकांनी हे नाव लावले असावे असे देखील ते म्हणाले.
तर महात्मा फुले मंडळचे अध्यक्ष मधुकर राऊत म्हणाले की, महात्मा फुले वाडा येथे लक्ष्मीबाई हरिहर यांच्या नावाचा फलक लावण्याची काहीच गरज नव्हती हा अत्यंत संतापजनक प्रकार आहे. नगरसेवकांनी मुदत उलटून गेल्यानंतर ऐतिहासिक वाड्यावर बोर्ड लावला. हा एक प्रकारचा विद्रूपीकरण व महात्मा फुले यांचा अपमान आहे. हा फलक व नावे त्वरीत काढून टाकावीत अन्यथा आंदोलन केले जाईल असा इशारा देण्यात आला आहे.
तर या संपूर्ण प्रकरणावर नगरसेविकेचे पती मोतीलाल हरिहर म्हणाले की, वाड्याच्या कमानीवर माझ्या आईच्या नावाचे फलक लावण्याचा निर्णय महापालिकेच्या नाव समितीमध्ये आम्ही मंजूर करून घेतला आहे. यात आमचा कौटूंबीक सहभाग आहे. यास कोणाचा विरोध असेल तर फलक काढण्याबाबत पुढचे पुढे बघू.
0 टिप्पण्या