Breaking News

ना डिजे, ना वायफळ खर्च, फक्त रुग्णसेवा; डॉक्टर दाम्पत्याचा आदर्श विवाहसोहळा


बीड :
आधी लगीन कोंढाण्याचं याच उक्तीचा अवलंब केलाय बीडच्या एका नवविवाहीत दाम्पत्याने. या दाम्पत्याने विवाहासाठी होणारा वायफळ खर्च टाळत ते पैसे वाचवून रुग्णांना सेवा दिली. या लगीन गाठ बांधण्याआधी वर आणि वधूने आधी सर्वरोग निदान शिबिराचे आयोजन केलं. एवढंच नाही तर त्यांनी दिवसभर वधू-वराच्या लग्नाच्या पोषाखात रुग्णांना सेवा दिली. खरं तर रुग्णांनाही प्रश्न पडला हे या वेषात का आहेत. मात्र या शिबिरावरुन हे वधु-वर थेट स्वत:च्या लग्नासाठी रवाना होणार होते. आणि म्हणूनच डॉ.वर्षा जाधव आणि डॉ.अभिजीत अर्सूल या दोघांच्या लग्नाची जिल्ह्यात मोठी चर्चा सुरु आहे. या लग्नाचं आणखी एक वैशिष्ट म्हणजे या वधु-वराने लग्नामध्ये ना डिजे आणला ना वायफळ खर्च केला. त्यांनी रुग्णांना सेवा देवून त्यांचे आशिर्वाद आपल्या पदरात पाडून घेतले.आयुष्याच्या नव्या प्रवासाला निघालेलं हे जोडपं आपली जबाबदारी विसरलं नाही. त्यांनी घेतलेल्या शपथीप्रमाणे आधी रुग्णांना सेवा दिली आणि नंतर त्यांचं शुभमंगल सावधान झालं. खरंतर अनेक असे रुग्ण आहेत त्यांना डॉक्टरांकडे जाण्यासाठीही पैसे नसतात. आणि असा रुग्णांची हीच गरज ओळखून या वर-वधूने या रुग्णांना मोफत सेवा दिली. प्रत्येक रुग्णासाठी डॉक्टर हा देवच असतो. पण या दोघांची खरंच माणसातल्या देवाचं दर्शन घडवलं. या नवविवाहीत दाम्पत्याचा आदर्श घेण्यासारखा आहे.

Post a Comment

0 Comments