म्हाडाची सदनिका मिळवून देण्याच्या आमिषाने महिलेची ५७ लाखांची फसवणूक


महाराष्ट्र गृहनिर्माण महामंडळाची (म्हाडा) सदनिका मिळवून देण्याच्या आमिषाने एका महिलेची ५७ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी एका विरोधात विश्रामबाग पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संतोष पवार (मेढा) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

महिला आणि आरोपी संतोष यांची ओळख होती. त्याने म्हाडाच्या योजनेतील सदनिका मिळवून देतो, असे आमिष महिलेला दाखविले होते. त्यानंतर महिलेकडून वेळोवेळी ऑनलाइन पद्धतीने ४१ लाख ६८ हजार रुपये घेतले. तसेच तिच्याकडून १६ लाख रुपयांचे सोन्याचे दागिनेही घेतले होते.

पैसे परत मागितल्यानंतर दिली धमकी

दरम्यान, पवारने महिलेला सदनिका मिळवून दिली नाही. त्यानंतर महिलेने त्याच्याकडे पैसे मागितले. तेव्हा पवारने महिलेला घरी बोलावून घेतले. तिला विवाहाचे आमिष दाखविले. मुलासह तुझा सांभाळ करेन, असे आश्वासन देऊन महिलेला जाळ्यात ओढले. पवारने महिलेवर बलात्कार केला. तसेच हा प्रकार कोणाला सांगितल्यास समाजमाध्यमावर छायाचित्रे प्रसारित करण्याची धमकी दिली. घाबरलेल्या महिलेने पोलिसांकडे तक्रार दिली असून विश्रामबाग पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास करण्यात येत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या