आज श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील कोलकाताचे आव्हान

 


मुंबईचे सलग तिसऱ्या विजयाचे लक्ष्य! 

नवी मुंबई : मुंबई इंडियन्स संघाचे सलग तिसऱ्या विजयाचे लक्ष्य असून सोमवारी इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) क्रिकेटमध्ये त्यांच्यापुढे कोलकाता नाइट रायडर्सचे आव्हान असेल.

हंगामाच्या सुरुवातीला सलग आठ सामने गमावल्याने मुंबईचा संघ बाद फेरीच्या शर्यतीतून बाहेर गेला. मात्र, त्यानंतर त्यांनी राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स यांच्याविरुद्ध सलग दोन विजयांची नोंद केली. त्यामुळे त्यांच्या खेळाडूंचा आत्मविश्वास उंचावला आहे.

दुसरीकडे, श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील कोलकाताला गेल्या सातपैकी केवळ एक सामना जिंकता आल्याने त्यांच्या बाद फेरीच्या आशा जवळपास संपुष्टात आल्या आहेत. त्यांना गेल्या सामन्यात लखनऊने ७५ धावांनी धूळ चारली. त्यामुळे त्यांचा डॉ. डी. वाय. स्टेडियमवर होणाऱ्या या सामन्यात विजयी पुनरागमनाचा प्रयत्न असेल.

रोहित, सूर्यकुमारवर भिस्त

गुजरातविरुद्धच्या सामन्यात कर्णधार रोहित शर्मा (४३) आणि इशान किशन (४५) या मुंबईच्या सलामीवीरांना अखेर सूर गवसल्याचे पाहायला मिळाले. त्यांचा आता कामगिरीत सातत्य राखण्याचा प्रयत्न असेल. मधल्या फळीची भिस्त सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा यांच्यावर आहे. तसेच टीम डेव्हिडने गेल्या सामन्यात २१ चेंडूंत नाबाद ४४ धावांची अप्रतिम खेळी केली. गोलंदाजीत मुंबईचा संघ जसप्रीत बुमरा, रायली मेरेडिच आणि डॅनियल सॅम्स यांच्यावर अवलंबून आहे.


फलंदाजांच्या कामगिरीची चिंता

कोलकाताच्या संघाला फलंदाजांच्या कामगिरीची चिंता आहे. लखनऊविरुद्ध त्यांचा डाव जेमतेम १०१ धावांत गारद झाला. यंदा कर्णधार श्रेयस (११ सामन्यांत ३३० धावा) आणि आंद्रे रसेल (११ सामन्यांत २७२ धावा) यांचा अपवाद वगळता कोलकाताच्या फलंदाजांना चांगली कामगिरी करता आलेली नाही. तसेच त्यांनी विशेषत: सलामीच्या जोडीत सातत्याने बदल केल्याचे पाहायला मिळाले आहे. गेल्या सामन्यात सलामीला आलेले बाबा इंद्रजित आणि आरोन फिंच हे फलंदाज अपयशी ठरले. त्यामुळे मुंबईविरुद्धच्या सामन्यात अजिंक्य रहाणेचे पुनरागमन होऊ शकेल. गोलंदाजीत उमेश यादवला सुनील नरिन, टीम साऊदी आणि रसेल यांची साथ मिळणे गरजेचे आहे.


* वेळ : सायं. ७.३० वा. *थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, १ हिंदी, सिलेक्ट १ (संबंधित एचडी वाहिन्यांवर)

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या