दखल न घेतल्याने आयुक्तालयासमोर आत्महत्येचा प्रयत्न

 


पुणे- 

वेतन न देणाऱ्या मालकाची तक्रार पोलीस घेत नसल्याच्या नैराश्यातून एका तरुणाने पोलीस आयुक्तालयासमोरील झाडावर चढून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. नागरिकांनी आणि पोलिसांनी तातडीने हालचाल करून या तरुणाला आत्महत्या करण्यापासून रोखले.

धनाजी शिंदे (वय २३, रा. लातूर) अशा या तरुणाचे नाव आहे. धनाजी हा कोंढवा परिसरातील एका वाहतूक व्यावसायिकाकडे काम करतो. गेल्या दोन महिन्यांपासून त्याला वेतन दिले नव्हते. धनाजी याचे वडील आजारी असल्यामुळे त्याला पैशाची गरज होती. परंतु, मालक पैसे देत नव्हता. काम करूनही पैसे मिळत नसल्यामुळे तो वैतागला होता. त्याने स्वारगेट पोलीस ठाण्यात जाऊन आपली कैफियत मांडण्याचा प्रयत्न केला, मात्र, पोलिसांनी योग्य ती दखल न घेतल्याने तो निराश झाला होता. त्यातून तो गुरुवारी दुपारी पुणे पोलीस आयुक्तालयासमोर आला. तत्पूर्वी त्याने मद्यप्राशन केले होते. पोलीस आयुक्तालयाच्या तीन क्रमांकाच्या प्रवेशद्वारासमोरील झाडावर चढून तो गळफास घेण्याचा प्रयत्न करू लागला. हा प्रकार लक्षात आल्यानंतर बंडगार्डन पोलिसांनी त्याची समजूत घालून त्याला खाली उतरवले. त्याची माहिती घेतली आणि न्याय मिळवून देण्याचे आश्वासन देत स्वारगेट पोलीस ठाण्यात पाठवले.

सहा महिन्यांपूर्वी पुणे पोलीस आयुक्तालयाच्या प्रवेशद्वारासमोर एका व्यक्तीने स्वतःला पेटवून घेतले होते. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला होता. चारित्र्य पडताळणी प्रमाणात मिळवताना पोलिसांकडून विलंब झाल्याने हा प्रकार घडल्याचा आरोप त्या वेळी करण्यात आला होता. या प्रकरणी खडकी पोलीस ठाण्यात एका महिला पोलीस कर्मचाऱ्याचे निलंबन देखील करण्यात आले होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या