औरंगाबाद : एकतर्फी प्रेमातून महाविद्यालयीन १९ वर्षीय तरुणी सुखप्रीत कौर हिचा निर्घृण खून करणारा शरणसिंग सेठी (वय २०) याला रविवारी दुपारी नाशिक जिल्ह्यातील लासलगावातून अटक केली. तेथे शरणसिंग याची बहीण राहत असून तिच्याकडे पोहोचताच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. शरणसिंग याने सुखप्रीतची हत्या केल्यानंतर एका ट्रकमधून लासलगावपर्यंत प्रवास केला. याप्रकरणात सुखप्रीत कौरचा भाऊ हरप्रीतसिंग प्रितपाल सिंग ग्रंथी (वय २४) यांनी वेदान्तनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार सुखप्रीतचा खून शरणसिंग सेठी याने एकतर्फी प्रेमातून केला. उस्मानपुरा भागातील गुरुद्वाराजवळ राहणारी सुखप्रीत ही बीबीएच्या प्रथम वर्षांत शिकत होती. शनिवारी दुपारी ती मैत्रीण दिव्या खटलानीसोबत असताना शरणसिंग तिथे आला. त्याने सुखप्रीतला सोबत नेऊन तिच्यावर १४ ते १५ धारदार शस्त्राचे वार केले. रक्ताच्या थारोळय़ात पडलेल्या तिच्या मैत्रीणीने सुखप्रीतचा भाऊ हरप्रीतसिंग यांना फोन करून बोलावले होते.
0 टिप्पण्या