औरंगाबाद : जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील लेबर कॉलनी अखेर बुधवारी भुईसपाट करण्यात खाली. ३३८ घरांच्या पाडापाडीचे काम सकाळी साडेसहाच्या सुमारास सुरू करण्यात आले. सकाळी साडेदहा पर्यंत जवळपास सर्वच घरांचा भाग जमीनदोस्त करण्यात आलेला होता.
याच सुमारास विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, महानगरपालिका आयुक्त आस्तिककुमार पाण्डेय यांनी संयुक्तपणे लेबर कॉलनीतील जमीनदोस्त झालेल्या परिसराची पाहणी केली. सुमारे १९ एकर परिसरातील एकूण ३३८ घरे, त्यातील ८ सदनिका, असा बांधकामाचा भाग पाडण्यासाठी जिल्हा प्रशासनासह सार्वजनिक बांधकाम विभागाकडून ३० जेसीबी, १३० पेक्षा इतर वाहनांसह व ७२१ एवढी प्रचंड पोलीस विभागाची यंत्रणा, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन, मनपाचे नागरिक पथक असा मोठा फौजफाटा पाडापाडीच्या ठिकाणी तैनात करण्यात आला होता. यामध्ये महिलांचेही एक पथक होते.
विशेष म्हणजे खबरदारी म्हणून पोलीस विभागाकडून लेबर कॉलनीच्या परिसरात अन्य नागरिकांना प्रवेश करण्यास मनाई करण्याचा आदेश मंगळवारी दुपारीच पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांनी काढला होता. बुधवारी सकाळपासून पोलीस उपायुक्त उज्ज्वल वनकर, पोलीस निरीक्षक अशोक गिरी यांच्यासह शहरातील १६ ते १७ पोलीस ठाण्याचे कर्मचारी लेबर कॉलनीच्या ठिकाणी बंदोबस्तासाठी तैनात होते. सकाळी साडेसहाच्या सुमारास श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज पुराणवस्तू संग्रहालयासमोरील वसंत शिंदे यांच्या घरापासून पाडापाडीला सुरूवात झाली.
या भागातून एकत्रच आठ ते दहा जेसीबी लेबर कॉलनी पाडण्यासाठी चालवण्यात आले. प्रारंभी पाडापाडीला विरोध करण्याचा प्रयत्न झाला. दरम्यान एका राजकीय कार्यकर्त्यांला ताब्यात घेतले. त्यानंतर मात्र पाडापाडीला वेग आला. सकाळी साडेअकराच्या सुमारास वाहतूकही बऱ्यापैकी खुली करण्यात आली.
बेघर नागरिकांचे पुनर्वसन : लेबर कॉलनी जमीनदोस्त केल्यानंतर जे रहिवासी बेघर झाले, ज्यांच्या नावावर घर नाही, अशांचे पुनर्वसन करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत, अशी माहिती विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी या वेळी माध्यमांशी बोलताना दिली. प्राप्त माहितीनुसार ३३८ पैकी १४४ रहिवाशांकडे स्वमालकीचे घर नाही. तर ८८ रहिवासी हे पोट भाडेकरू असून, त्यांची जागेच्या व्यवहारात फसवणूक झाली असण्याची शक्यता वर्तवण्यात आली.
डबडबलेले डोळे आणि सांत्वन
चाळीस वर्षांपेक्षा अधिकचा रहिवास राहिलेल्या लेबर कॉलनीतील बायाबापुडय़ांचे डोळे पाडापाडी करताना डबडबत होते. अश्रूंना वाट मोकळी करून देत परस्परांना कवटाळत सांत्वन करतानाचे चित्र मन हेलावणारे होते. दिवसभर पाडलेल्या ढिगाऱ्यांमध्ये आपल्या काही आठवणी सापडतात का, याची पाहणी ते करत होते. लेबर कॉलनी आता इतिहासजमा झाली. भंगार साहित्य खरेदी करणाऱ्यांची अनेक वाहने गंजलेले-तुटलेले पत्रे, लाकडी चौकटीसह इतर सामान नेण्यासाठी दाखल झाली होती.
0 टिप्पण्या