उद्धव ठाकरेंच्या सभेवर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया; फिल्मी स्टाइल प्रतिक्रिया देताना म्हणाले, “उसळलेल्या हिंदू…”


शिवसेनेने सुरू केलेल्या शिवसंपर्क अभियानाअंतर्गत मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सभा शनिवारी वांद्रे-कुर्ला संकुलातील मैदानावर झाली. या सभेला मोठ्यासंख्येने शिवसैनिकांनी उपस्थिती लावली होती. या सभेमध्ये मुख्यमंत्र्यांबरोबरच पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनीही भाषण केले. या सभेमध्ये बोलताना उद्धव ठाकरेंनी भाजपचे हिंदुत्व, केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर त्याचबरोबर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांचा समाचार घेतला. या सभेनंतर संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेंचा सभेमधील फोटो शेअर करत पुन्हा एकदा भाजपाला आव्हान दिलंय.

राऊत यांचा औरंगजेबच्या मुद्द्यावरुन निशाणा तर मुख्यमंत्र्यांचा हिंदुत्वावरुन टोला…

संजय राऊत यांनी बीकेसीमधील मैदानावर झालेल्या सभेमध्ये औरंगजेबच्या कबरीच्या दर्शनावरुन होत असणाऱ्या टीकेला उत्तर दिलं. औरंगजेब हा गुजरातेत जन्मला अन् त्याला महाराष्ट्रात गाडला, अशा शब्दांत संजय राऊत यांनी भाजपावर निशाणा साधला. तर दुसरीकडे भाजपाकडून सातत्याने शिवसेनेच्या हिंदुत्वासंदर्भात होणाऱ्या टीकेला उत्तर देताना उद्धव ठाकरेंनी भाजपा आणि शिवसेनेच्या हिंदुत्वामधील फरक सांगितला. भाजपाच्या विकृत-विखारी हिंदुत्वामुळे देशाची दुर्दशा झाल्याची टीका मुख्यमंत्र्यांनी केली. भाजपाचे हिंदुत्व विकृत असून ते आम्हाला मान्य नाही. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्वाचा विचार दिला. पण भाजपा हिंदुत्वाचा विखार पसरवत आहे. या हिंदुत्त्वातून देशाला दिशा काय देणार? त्यातून देशाची दुर्दशा होत असल्याची टीका उद्धव ठाकरे यांनी केली. हिंदुत्वासाठी तुम्ही काय केले, याचे दाखले समोर ठेवा, असे आव्हानही मुख्यमंत्र्यांनी दिले.

संस्कार, संस्कृती आणि सुसंस्कृतपणा संपला तर हिंदुत्व…

भाजपाचे हिंदुत्ववादी खालच्या पातळीची, विखारी भाषा करतात. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याबद्दल गलिच्छ विचार त्यांनी व्यक्त केले. हेच का भाजपाचे, संघाचे, भाजपाप्रणित रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे संस्कार, असा सवाल ठाकरे यांनी केला. संस्कार, संस्कृती आणि सुसंस्कृतपणा संपला तर हिंदुत्व कसले, असेही त्यांनी सुनावले.

भाजपाचे हे हिंदुत्त्व म्हणजे…

महागाई, बेरोजगारी आणि काश्मीरमधील दहशतवादावरून मुख्यमंत्री ठाकरे यांनी केंद्र सरकारवर टीका केली. काश्मीरमध्ये राहुल भटला जिथे मारले तिथे काय हनुमान चालिसा म्हणायची? हे काश्मार फाईलचे पुढचे पाऊल आहे काय? असा सवाल त्यांनी केला. भाजपाचे हे हिंदुत्त्व म्हणजे भ्रमिष्ट करण्याचे हिंदुत्त्व असल्याची टीकाही मुख्यमंत्र्यांनी केली.

राऊत यांनी शेअर केला फोटो

शनिवारी सायंकाळी झालेल्या या सभेनंतर आज संजय राऊत यांनी फेसबुकवरुन या सभेत भाषण देतानाचा मुख्यमंत्र्यांचा फोटो शेअर केलाय. या फोटोमध्ये त्यांनी आदित्य ठाकरे आणि महाराष्ट्र भाजपाही टॅग केलं आहे. हा फोटो शेअर करताना राऊत यांनी एकदम फिल्मी कॅप्शन दिलीय. उद्धव ठाकरेंचा उल्लेख राऊत यांनी, “उसळलेल्या हिंदू जनसागराचा सेनापती”, असा केलाय. पुढे बोलताना राऊत यांनी, “झुकेंगे नही..” असंही फोटो कॅप्शनमध्ये म्हटलंय.

‘पुष्पा’ चित्रपटातील ‘झुकेगा नही साला,’ या संवादाच्या पार्श्वभूमीवर यापूर्वीही संजय राऊत यांनी शिवसेना भाजपासमोर आणि केंद्रीय तपास यंत्रणांसमोर झुकणार नाही असं म्हटलं होतं. कालच्या सभेच्या निमित्ताने पुन्हा एकदा त्यांनी हाच उल्लेख सोशल नेटवर्किंगवरुन केलाय.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या