प्रसादने सांगितला शुटिंग दरम्यानचा मेकअपचा अनुभव


“पावसाचं पाणी साचतं तेवढं पाणी विगच्या खाली…”

ठाण्यात शिवसेनेचं स्थान बळकट करणारे, कट्टर शिवसैनिक म्हणून ओळख निर्माण करणारे दिवंगत नेते धर्मवीर आनंद दिघे यांचा जीवनप्रवास प्रेक्षकांना मोठ्या पडद्यावर दाखवणारा ‘धर्मवीर: मुक्काम पोस्ट ठाणे’ हा सिनेमा आज सर्वत्र प्रदर्शित झाला. प्रवीण तरडे लिखित आणि दिग्दर्शित हा सिनेमा आहे. प्रसाद ओक या चित्रपटात धर्मवीर आनंद दिघे यांची भूमिका साकारताना दिसणार आहे. ‘धर्मवीर’ या चित्रपटाच्या निमित्ताने नुकतंच अभिनेता प्रसाद ओकने ‘लोकसत्ता डॉट कॉम’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याने आनंद दिघे यांची भूमिका साकारताना त्यांच्यासारखं दिसण्यासाठी केलेल्या मेकअपबद्दल सांगितलं.


सिनेमात प्रसाद ओकला अशा पद्धतीने मेकअप केला आहे पडद्यावर बघितलं की खरोखर आनंद दिघेच आहेत असं वाटत. या मेकअपमागे खूप मेहनत असल्याचंही तो सांगतो. लोकसत्ता डॉट कॉम’ला दिलेल्या मुलाखतीच्या वेळी प्रसादने सांगितलं की, ” शुटिंगच्या दरम्यान मी थोडसं जरी वाकलो तरी हेअर विग सरकायचा. १२ तासांची शिफ्ट १४ तास चालायची, कधी कधी अगदी १६ तास चालायची. विग काढल्यानंतर अक्षरशः पावसाचं पाणी साचतं तसं माझ्या डोक्यावर घाम साचायचा. तो विग जागेवरून हलू नये म्हणून पटकन खाजवताही येत नव्हतं. विग, दाढी याकडे लक्ष देताना आपण नीट काम करतोयना याची चिंता असायची.”

प्रसाद आणि आनंद दिघे यांच्या हास्यामध्ये फरक होता. प्रसाद हसतो तेव्हा त्याचे दात दिसत नाहीत पण आनंद दिघे जेव्हा हसायचे तेव्हा त्यांचे दात दिसायचे. ही बारीकशी गोष्टही हुबेहूब दिसावी म्हणून प्रसादच्या हास्यावर काम करण्यात आलं होत. त्याबद्दल तो सांगतो की, ” हसताना दात दिसण्यासाठी डेंगचर लावलं होत. शुटिंगच्या दरम्यान ते निघू नये म्हणून काळजी घ्याववी लागायची.ते जास्त मोठ असल्यामुळे माझ्या हिरड्या दुखायला लागायच्या आणि त्याचा स्ट्रेस डोक्यावर यायचा. डोक्यावर विग असायचा त्यामुळे अर्ध शुटिंग मी डोके दुखितच केलं आहे.”

१३ मे अर्थात आज सर्वत्र हा सिनेमा प्रदर्शित झाला आहे. या सिनेमाचा खास शो आज सकाळी ठाण्यातील व्हिवियाना मॉल येथील सिनेपोलिस मल्टिप्लेक्समध्ये पार पडला. यावेळी उपस्थित असलेल्या सर्व पाहुण्यांचे ढोल आणि लेझीम पथकाच्या तालास्वरात, मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले. तसेच धर्मवीर आनंद दिघे यांच्या कटआउटसमोर विधिवत पूजा करित दुग्धाभिषेक करण्यात आला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या