पूर्वमोसमी पावसाने यंदा पाठ फिरवली

 


वैशाख वणव्याने अंगाची लाही-लाही होत असताना काहीसा दिलासा देणाऱ्या आणि पाणीसाठय़ात काही अंशी भर घालणाऱ्या पूर्वमोसमी पावसाने यंदा राज्याकडे पाठ फिरवल्याचे स्पष्ट झाले आहे.

राज्यातील सात जिल्ह्यांमध्ये आतापर्यंत एक टक्काही पूर्वमोसमी पाऊस झालेला नाही, तर २० जिल्ह्यांत अत्यल्प पावसाची नोंद झाली. उर्वरित सर्व जिल्ह्यांत सरासरीच्या तुलनेत पाऊस उणाच असल्याचे आढळते. महाराष्ट्रात सरासरीपेक्षा ६६ टक्के पाऊस उणा असून, देशात एकूण दहा राज्यांतही पूर्वमोसमी पावसाचे प्रमाण अत्यल्पच आहे. मार्च ते मे या तीन महिन्यांत पडणारा पाऊस पूर्वमोसमी समजला जातो. उन्हाळय़ामुळे या काळात पाण्याची गरज वाढते. त्याचप्रमाणे बाष्पीभवनही मोठय़ा प्रमाणावर होत असल्याने धरणांतील पाणीसाठा झपाटय़ाने कमी होत असतो. या काळात पूर्वमोसमी पावसातून काही प्रमाणात का होईना धरणांतील पाणीसाठय़ात भर पडते. मात्र, यंदा राज्यात तुरळक भागांतच पूर्वमोसमी पाऊस झाला. राज्याच्या बहुतांश भाग कोरडा राहिला असल्याचे हवामानशास्त्र विभागाच्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. संपूर्ण राज्यामध्ये सरासरी २८ ते २९ मिलिमीटर पाऊस अपेक्षित असताना तो केवळ ६६ टक्के म्हणजे ९ ते १० टक्केच झाला आहे. महाराष्ट्रासह पंजाब, हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्मीर, राजस्थान, चंडीगड आदी उत्तरेकडील भागासह गुजरातमध्येही पूर्वमोसमी पावसाचा टक्का यंदा कमी आहे.

राज्यातील धरणांमध्ये सध्या एकूण ३५ टक्क्यांच्या आसपास पाणीसाठा आहे. पूर्वमोसमी पावसाचा हंगाम सुरू होताना १ मार्च रोजी राज्यातील धरणांत ७१ टक्के पाणीसाठा होता. मे महिन्याच्या अखेपर्यंत त्यात ३६ टक्क्यांनी घट झाली आहे. सध्या सर्वात कमी पाणीसाठा पुणे विभागात २८ टक्के, तर त्याखालोखाल नाशिक, नागपूर विभागात ३३ ते ३४ टक्के आणि कोकण, औरंगाबाद विभागात अनुक्रमे ४३ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.

सध्या र्नैऋत्य मोसमी पावसाने केरळमध्ये प्रवेश केला आहे. महाराष्ट्राचा बहुतांश भाग मात्र उन्हाने होरपळत आहे. महाराष्ट्राला मोसमी पावसाची प्रतीक्षा आहे. तो तळकोकणातून प्रवेशतो आणि नंतर राज्य व्यापून टाकतो. यंदा त्याच्या प्रवासाबद्दल उत्सुकता आहे.

एक टक्काही पाऊस नाही. नंदूरबार, बीड, िहगोली, जालना, भंडारा, बुलढाणा, वाशिम या सात जिल्ह्यांमध्ये संपूर्ण हंगामात एक टक्काही पूर्वमोसमी पाऊस होऊ शकला नाही. मुंबई शहर, मुंबई उपनगरे, ठाणे, पालघर, रायगड, नगर, नाशिक, पुणे, सातारा, औरंगाबाद, लातूर, नांदेड, परभणी, अकोला, अमरावती, चंद्रपूर, गोंदिया, नागपूर, वर्धा, यवतमाळ या जिल्ह्यांत पूर्वमोसमी पावसाचे प्रमाण अत्यल्प ठरले. येथे ७० ते ९० टक्क्यांपर्यंत पाऊस उणा ठरला.


मोसमी पावसाने तीन दिवस आधी, म्हणजे २९ मे रोजी केरळमध्ये प्रवेश केला असला, तरी ३० मे रोजी त्याने विश्रांती घेतली. मोसमी वाऱ्यांच्या प्रवासासाठी पोषक वातावरण असल्याचे हवामान विभागाचे म्हणणे आहे. त्यामुळे तीन-चार दिवसांत तो संपूर्ण केरळ, मध्य अरबी समुद्रातील काही भाग तसेच तमिळनाडू आणि कर्नाटकातील काही भागांत प्रवेश करू शकतो. महाराष्ट्रात पुढील दोन ते तीन दिवस प्रामुख्याने दक्षिण भागात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे.


मोसमी पावसाचे आगमन लांबल्यास किंवा जूनमध्ये तो पुरेसा न कोसळल्यास पाणीसाठय़ाबाबत गंभीर स्थिती निर्माण होण्याची भीती आहे. कारण सध्या राज्यातील धरणांत केवळ ३५ टक्के पाणीसाठा आहे. जूनमध्ये किती पाऊस पडतो यावर राज्यातील पाणी संकटाची तीव्रता अवलंबून आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या