“मुख्यमंत्र्यांनी आदेश दिला तर मी राणा दाम्पत्याच्या विरोधात…”, अब्दुल सत्तार यांचं मोठं वक्तव्य


महसूल राज्यमंत्री आणि शिवसेना नेते अब्दुल सत्तार यांनी खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना थेट आव्हान दिलंय. “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मला आदेश दिला, तर मी अमरावतीत जाऊन खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्याविरोधात शिवसेनेच्या धनुष्यबाणावर निवडणूक लढेल,” असं मत अब्दुल सत्तार यांनी व्यक्त केलं. ते रविवारी (८ मे) रात्री बीडमध्ये बोलत होते.

अब्दुल सत्तार म्हणाले, “राणे चार आणेसारखी गोष्ट करत आहेत. चारआणेवाला इतक्या मोठ्या डोंगराला आव्हान करत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जे जे बोलले ते ते त्यांनी केलं. त्यांचं लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणून देशात नाव आहे. काही लोकांना बोलण्यासाठी माईक पाहिजे, काही तरी विषय पाहिजे. म्हणून ते अशा विषयांवर बोलतात. मुख्यमंत्र्यांनी मला आदेश दिला तर मी अमरावतीत जाऊन नवनीत राणा आणि रवी राणा यांच्याविरोधात शिवसेनेच्या धनुष्यबाणावर निवडणूक लढेल.

“राणा दाम्पत्य भाजपाची सुपारी घेऊन बोलत आहेत”

“राणा दाम्पत्य अशी निवडणूक लढणार नाहीत. कारण ते कधी आरक्षणाची गोष्ट करतात, कधी मागासवर्गीयांवर अन्यायाचा मुद्दा उपस्थित करतात. जाती धर्माची नावं घेऊन राजकारण करणं सोपं आहे. राणा दाम्पत्य भाजपाची सुपारी घेऊन बोलत आहेत. त्याचं उत्तर आम्ही निश्चित देऊ,” असं मत अब्दुल सत्ता यांनी व्यक्त केलं.

“दानवेंनी महाराष्ट्रात रेल्वे प्रकल्प आणावेत, मी जागा उपलब्ध करून देतो”

अब्दुल सत्तार यांनी रावसाहेब दानवे यांच्यावरही निशाणा साधला. ते म्हणाले, “उद्धव ठाकरे यांनी मला मंत्रिमंडळात महसूल सारख्या महत्त्वाच्या खात्याचा मंत्री केलंय. आता रावसाहेब दानवे यांनी रेल्वे खात्याच्या माध्यमातून दिल्ली सरकारकडून महाराष्ट्रासाठी झुकतं माप द्यावं, मी महसूल मंत्री म्हणून ज्या ज्या ठिकाणी जागा कमी पडेल त्या त्या ठिकाणी जागा उपलब्ध करून देईल.”

“दुष्काळ पडल्यावर शिवाजी महाराजांवरून गुजरातहून पैसा आणला, पण आता…”

“छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राचे राजे होते तेव्हाही दुष्काळ पडला, पण महाराजांनी त्यावेळी गुजरातमधील सुरतहून महाराष्ट्रात पैसा आणला. आज संपूर्ण देशाचा पैसा गुजरातला चालला आहे. त्याचा रावसाहेब दानवे यांनी हिशोब घेतला आणि महाराष्ट्राला, बीड जिल्ह्याला न्याय दिला तर त्यांनी काही कर्तव्य केलं असं म्हणता येईल. त्यांनी कमीत कमी जालना ते जळगाव रेल्वे आणावी,” असं म्हणत सत्तार यांनी दानवेंना टोला लगावला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या