मुंबईसाठी २२ दिवस धोक्याचे! ‘या’ काळात मुसळधार पाऊस झाल्यास तुंबई होणार


पावसाळा तोंडावर आला की मुंबईत नालेसफाई आणि नियोजनाची लगबग सुरु होते. ठिकठिकाणी पाणी तुंबू नये यासाठी विविध उपाययोजना केल्या जातात. मात्र अनेक ठिकाणी कामं वेळेत पूर्ण न झाल्याने पाणी साचल्याचा घटना पाहायला मिळतात. त्यामुळे नालेसफाईवरून राजकारण चांगलंच तापतं. यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या आढावा बैठकीदरम्यान, नागरी संस्था आणि इतर एजन्सीच्या अधिकाऱ्यांना मान्सूनपूर्व सुरू असलेल्या कामांची पाहणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या. मात्र या व्यक्तिरिक्त मुंबई तुंबई होण्यास कारणीभूत ठरते ती समुद्राला येणारी भरती. या कालावधीमध्ये जोरदार पाऊस पडल्यास पाणी मुंबई शहरामध्ये साचून राहण्याची भीती असते. नालेसफाईसोबतच समुद्राच्या भरतीकडेही प्रशासनाला लक्ष द्यावं लागतं. यंदा जून ते सप्टेंबर महिन्यात २२ दिवस असे आहेत की, त्या दिवशी समुद्राला मोठी भरती येणार आहे. त्यामुळे या कालावधीत मुसळधार पाऊस झाला तर तुंबई होईल, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. जून, जुलै महिन्यात प्रत्येकी सहा दिवस आणि ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यात प्रत्येकी पाच दिवस मोठी भरती असणार आहे, असं आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या डेटावरून समोर आलं आहे.

जून ते सप्टेंबर या कालावधील सर्वात मोठी भरती ४ जून आणि ३ जुलै रोजी असणार आहे. “उच्च भरतीच्या वेळी, प्रशासन सतर्क असेल कारण त्याच दिवशी मुसळधार पाऊस काही भागांमध्ये दीर्घकालीन पूरास कारणीभूत ठरतो. शहराच्या आम्ही संबंधित वॉर्ड अधिकार्‍यांना ड्रेनेज साफ करणे, रस्त्यांची दुरुस्ती, झाडांची छाटणी यासारखी सर्व मान्सूनपूर्व कामे वेळेत पूर्ण होतील याची काळजी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत,” असं बीएमसीच्या एका अधिकाऱ्याने सांगितले. २०२१मध्ये मुंबईत १८ दिवस भरतीचे होते.

दुसरीकडे, भूस्खलन प्रवण भागात राहणाऱ्या लोकांच्या प्रश्नावरही बैठकीत चर्चा झाली. अधिकार्‍यांच्या म्हणण्यानुसार, भूस्खलनाची प्रवण क्षेत्रे म्हणून ७२ ठिकाणे ओळखण्यात आली असून त्यापैकी ४५ धोकादायक म्हणून चिन्हांकित करण्यात आली आहेत. वार्षिक प्रोटोकॉलनुसार, मुंबई महानगरपालिका अशा भागात राहणाऱ्या लोकांना पावसाळ्यात सुरक्षित ठिकाणी जाण्यास सांगून त्यांना नोटीस पाठवण्यास सुरुवात करेल.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या