बुमराहने ९ चेंडूत ५ विकेट्स घेतल्यानंतर सामन्यादरम्यान मैदानातूनच त्याच्या पत्नीनं केली खास पोस्ट; म्हणाली, “माझा नवरा…”


नवी मुंबईमधील डी व्हाय पाटील स्टेडियमवर सोमवारी पार पडलेल्या इंडियन प्रीमियर लीगमधील (आयपीएल) मुंबई इंडियन्स विरुध्य कोलकाता नाइट रायडर्स सामन्यामध्ये यजमान संघाचा दारुण पराभव झालाय. हंगामाच्या सुरुवातीला सलग आठ सामने गमावल्याने मुंबईचा संघ बाद फेरीच्या शर्यतीतून बाहेर गेला. मात्र, त्यानंतर त्यांनी राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स यांच्याविरुद्ध सलग दोन विजयांची नोंद केली. त्यामुळे त्यांच्या खेळाडूंचा आत्मविश्वास उंचावला होता. पण केकेआरविरुद्ध पुन्हा एकदा मुंबईचा खेळ फसल्याचं दिसून आलं अन् संघाचा ५२ धावांनी पराभव झाला. मुंबईचा पराभव झाला असला तरी जसप्रित बुमराहची कामगिरी चर्चेचा विषय ठरतेय.


बुमराहने मौक्याच्या क्षणी कोलकात्याच्या तब्बल पाच फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवत विरोधी संघाला धावांचा डोंगर उभारण्यापासून रोखलं. बुमराहने अवघ्या १० धावांमध्ये पाच गडी तंबूत पाठवले. या कामगिरीमुळे सामन्याचे पारडे मुंबईच्या बाजूने झुकेल असं वाटत होतं. मात्र मुंबईच्या फलंदाजांनी पुन्हा एकदा गोलंदाजांच्या कामगिरीवर पाणी फेरले. बुमराहने ही कामगिरी केली तेव्हा त्याची पत्नी संजना गणेशनसुद्धा मैदानामध्ये उपस्थित होती. आपल्या पतीची कामगिरी पाहून सामना सुरु असतानाच संजनाने त्याच्यासाठी एक खास ट्विटही केलं.

बुमराहची कामगिरी पाहून अनेक दिग्गजांनी तसेच आजी माजी खेळाडूंनी ट्विटरवरुन त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला. यामधील काही मोजकी ट्विट्स आधी पाहूयात…

दरम्यान, याशिवाय बुमराहच्या पत्नीनेही सामना सुरु असतानाच म्हणजेच सामन्यातील पहिला डाव संपल्यानंतर रात्री ९ वाजून १० मिनिटांनी ट्विटरवरुन नवऱ्याच्या कामगिरीचं कौतुक केलंय. स्वत: एक उत्तम क्रिकेट सुत्रसंचालिका असणाऱ्या संजनाने इमोन्जी वापरुन बुमराहचं कौतुक केल्याचं पहायला मिळालं. “माझा नवरा फायर आहे,” अशा अर्थाचं ट्विट संजनाने केलंय.

संजना स्वत: सामना पाहण्यासाठी मैदानामध्ये उपस्थित होती. तिने सामन्यादरम्यान केलेलं हे ट्विट व्हायरल झालं असून तीन हजार ८०० हून अधिक जणांनी ते रिट्विट केलं आहे तर ६४ हजार लोकांनी त्याला लाइक केलंय. बुमराहने ९ चेंडूंमध्ये पाच जणांना बाद केल्यानंतर संजनाच्या चेहऱ्यावरील आनंद आणि आश्चर्याचे मिश्र भाव पाहण्यासारखे होते. कॅमेरामनने तिची ही भावनिक प्रतिक्रिया कॅमेरात अचूक टीपली. दरम्यान, बुमराहने पहिल्यांदाच आयपीएलमध्ये पाच विकेट्स घेण्याचा पराक्रम केलाय.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या