कडधान्यांचा जेमतेम 7 टक्केच पेरा, पावसाअभावी पेरण्या लांबणीवर

 



जून महिना संपत येऊनही राज्यात पुरेशा पावसाअभावी खरीप हंगामातील पेरण्या लांबणीवर पडल्या आहेत. तसेच, खरिपातील सुमारे 142 लाख हेक्टरपैकी सोमवारअखेर 16.92 लाख हेक्टरवर म्हणजे सरासरीच्या 11.92 टक्के क्षेत्रांवरील पेरण्या पूर्ण झाल्या आहेत.

भात व नाचणी पिकांच्या रोपवाटिकांची कामे काही भागांत सुरू असल्याचे चित्र आहे. खरिपातील मूग आणि उडदाच्या क्षेत्रात घट होण्याची शक्यताही कृषी विभागातून वर्तविण्यात येत आहे. खरीप हंगामातील जमिनीच्या पूर्व मशागतीची कामे सुरू असून, पुरेशा पावसामुळे त्यावर मर्यादा येत आहेत.


काही भागांत मागील दोन-तीन दिवसांपासून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे ज्वारी, बाजरी, कापूस, सोयाबीन, तूर, मूग, उडीद पिकांच्या पेरणीची कामे काही ठिकाणी सुरू आहेत. राज्यात 27 जूनअखेरच्या पर्जन्यमानाची सरासरीच्या तुलनेत स्थिती कृषी विभागाच्या ताज्या अहवालात स्पष्ट करण्यात आली आहे. त्यानुसार एकूण 355 तालुक्यांत सरासरीच्या तुलनेत 22 तालुक्यांत शून्य ते 25 टक्के, 76 तालुक्यांत 25 ते 50 टक्के, 108 तालुक्यांत 50 ते 75 टक्के, 79 तालुक्यांत 75 ते 100 टक्के, तर 70 तालुक्यांमध्ये शंभर टक्क्यांपेक्षा जास्त पाऊस झाला आहे.


कोकण विभागात पावसाच्या उपलब्धतेनुसार भात, नाचणी पिकांच्या रोपवाटिकेतील पेरणीची कामे सुरू आहेत. तसेच मागील दोन-तीन दिवसांपासून पावसास सुरुवात झाली आहे. नाशिक विभागात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसास मागील दोन दिवसांपासून सुरुवात झाली आहे. पुणे विभागात पेरणीयोग्य पाऊस न झाल्याने पेरण्या खोळंबल्या आहेत. काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसास सुरुवात झाली आहे. कोल्हापूर विभागात काही ठिकाणी भातपिकाची धूळवाफ व ज्वारी, बाजरी, मका, सोयाबीन पिकांच्या पेरणीस काही प्रमाणात सुरुवात झाली आहे.


राज्यात कडधान्ये पिकांखाली 22 लाख 18 हजार 599 हेक्टर इतके क्षेत्र आहे. त्यापैकी जेमतेम 1 लाख 60 हजार 382 हेक्टरवरील (7 टक्के) पेरणी पूर्ण झाली आहे. तुरीचे क्षेत्र 12.75 लाख हेक्टर इतके आहे. मुगाचे 4.83 लाख हेक्टर आणि उडदाचे 3.58 लाख हेक्टर क्षेत्र आहे. जून महिना संपत आल्यामुळे मूग आणि उडदाच्या पेरण्यांचा कालावधी संपण्याच्या मार्गावर असून, या दोन्ही पिकांचे क्षेत्र कमी होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या