तरुणांना रोजगार देण्यासाठी ७१ कंपन्या स्थापन

 


पुणे- 

जिल्ह्यातील तरुणाईला ग्रामीण भागातच रोजगार मिळण्यासाठी जिल्हा परिषदेने पुढाकार घेतला आहे.

त्याअंतर्गत महिला शेतकरी आणि बचत गटांच्या माध्यमातून ७१ कंपन्या स्थापन केल्या जाणार आहेत. प्रत्येक जिल्हा परिषदेच्या गटात रोजगार देणारी उत्पादन प्रकल्प उभारली जाणार आहेत.

कंपन्या स्थापन केल्यानंतर राज्य सरकार, जिल्हा परिषदेच्या वतीने निधी आणि विविध बँकांच्या माध्यमातून सवलतीच्या व्याजदरातील कर्जरूपी भांडवल उपलब्ध करून दिले जाणार आहे. या कंपन्यांमधून निर्माण केलेल्या उत्पादनांना फायदेशीर बाजारपेठ उपलब्ध करून दिली जाणार आहे. कच्च्या मालाच्या मूल्यवर्धनाच्या माध्यमातून उत्पादन वाढविले जाणार आहे. बचत गटांची उत्पादन कार्यक्षमता वाढविण्यात येणार असून बचत गटांनी तयार केलेल्या वस्तुंची गुणवत्ता सुधारण्यास वाव असणार आहे. अशी या प्रकल्पाची प्रमुख उद्दिष्टे असणार आहेत, अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक आयुष प्रसाद यांनी दिली.

जिल्ह्यात यापूर्वीपासून राबविण्यात येत असलेल्या एक गट, एक उत्पादनावर अधिक भर दिला जाणार आहे. त्यामुळे महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या मालाला बाजारपेठ मिळून बचत गट आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यास हातभार लागू शकणार आहे.

राज्याच्या ग्रामविकास व पंचायतराज विभागाच्या उमेद उपक्रमांतर्गत 'महाजीविका अभियान' सुरू केले आहे. या अभियानाची सुरूवात जागतिक महिला दिनाच्या दिवशी करण्यात आली आहे. महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हाव्यात, यासाठी २०२२-२३ हे वर्ष उपजीविका वर्ष म्हणून साजरे केले जाणार आहे. यामध्ये उपजीविका व विपणन या विषयावर अधिक भर देण्यासाठी नवीन महाजीविका अभियान सुरु केले आहे, असेही आयुष प्रसाद यांनी सांगितले.

जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील गावागावांत रोजगार निर्मिती प्रकल्प उभारणीसाठी आतापर्यंत महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान आणि जिल्हा नियोजन समितीच्या (डीपीडीसी) माध्यमातून ३९ कोटी रूपये निधी उपलब्ध करून दिला आहे. याशिवाय, विविध बँकांच्या माध्यमातून सवलतीच्या व्याजदराने २०० कोटी रुपयांचे कर्ज उपलब्ध करून दिले आहे. - आयुष प्रसाद, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या