“खोटं सांगत नाही, कधी कधी अती व्यायाम वर घेऊन जातो, त्यामुळे…”; अजित पवारांचा तरुणांना सल्ला


राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यायामशाळेत (जीम) येऊन व्यायाम करणाऱ्या तरुणांना महत्त्वाचा सल्ला दिला आहे. “व्यायाम करताना कसाही करून चालत नाही. त्यामुळे व्यायामशाळेत आल्यावर प्रशिक्षकाच्या सल्ल्याशिवाय व्यायाम करू नका. कधी कधी अती व्यायाम वर घेऊन जातो,” असा इशारा अजित पवार यांनी व्यायाम करणाऱ्यांना दिला. ते शनिवारी (४ जून) पुण्यात चंचला कोद्रे यांच्या नावाने सुरू झालेल्या व्यायामशाळेच्या उद्घाटन कार्यक्रमात बोलत होते.

अजित पवार म्हणाले, ” नागरिकांच्या सर्वांगीण विकासाचा विचार करता तंदुरुस्त शरीरासाठी व्यायाम खूप महत्त्वाचा आहे. आपलं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी व्यायाम आणि खेळणं खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे अशाप्रकारच्या सुविधा देण्याचं काम आम्हा लोकांचं सुरू आहे. आम्ही क्रिडांगणं देखील विकसित करतो आहे. त्यात अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या सुविधा या देण्यासाठी आमचा प्रयत्न आहे. मैदानी खेळांनी शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगलं राहतं. मात्र, गेले दोन वर्षे करोनाच्या संकटामुळे खेळापासून आणि मैदानापासून आपण सर्वजण थोडेसे दुरावलो होतो.”

“व्यायाम करताना कसाही व्यायाम करून चालत नाही”

“असं असलं तरी गेल्या काही दिवसांपासून निर्बंध कमी केले आहेत. त्यामुळे मैदानं पुन्हा लोकांच्या गर्दीने फुलायला लागली आहेत. त्या गोष्टीचा खूप फायदा तुम्ही करून घ्या. व्यायाम करताना कसाही व्यायाम करून चालत नाही. त्यामुळे जीममध्ये आल्यावर सल्ल्याशिवाय व्यायाम करू नका. प्रशिक्षकाला विचारा. कधी कधी अती व्यायाम वर घेऊन जातो. खोटं सांगत नाही, अशा घटना घडल्या आहेत,” असा सल्ला अजित पवार यांनी दिला.

“तर स्वतःचं वाटोळं कराल”

“तुमच्या शरीराचं वय काय आहे यावर व्यायाम ठरतो. त्यामुळे प्रशिक्षकांच्या सल्ल्याने व्यायाम करा. उगाच कोणी काही तरी असे जोर काढ, अशा बैठका काढ असा सल्ला दिला तर स्वतःचं वाटोळं कराल. तसं काही करू नका,” असंही अजित पवार यांनी नमूद केलं.

“आता परत करोना वाढतो आहे”

वाढत्या करोना रुग्णांबाबत बोलताना अजित पवार म्हणाले, “आता परत करोना वाढतो आहे. सगळे सांगतात मास्क घाला. मुख्यमंत्री म्हणतात, मी म्हणतो मास्क घाला. या ठिकाणी बसलेल्या भगिनींनी मास्क घातला आहे, पण स्टेजवर फक्त एकाने मास्क घातलं आहे, बाकी कोणीच मास्क घातलं नाही. अजून करोना पूर्णपणे नष्ट झाला नाही. करोना चाचण्या कमी आहेत. सर्वांनी लस घ्या, बुस्टर डोस घ्या.”

“करोना गेलेला नाही, काळजी घ्यायला हवी”

“राज ठाकरे, सोनिया गांधी यांना करोना झाला आहे. राज ठाकरे याचं ऑपरेशन होतं त्यावेळी डॉक्टर सर्व चाचण्या करतात. त्यात राज ठाकरे यांना करोना संसर्ग झाल्याचं समजलं. करोना गेलेला नाही, काळजी घ्यायला हवी,” असं मत अजित पवार यांनी व्यक्त केलं.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या