“सरकारने दिलेल्या आश्वासनांचे बुडबुडे निरपराध्यांच्या रक्ताने…”; काश्मिरी पंडितांवरील हल्ल्यांवरुन शिवसेनेचा मोदी सरकारला सवाल


जम्मू-काश्मीरमध्ये मागील काही दिवसांपासून सर्वसामान्यांवर होत असणाऱ्या हल्ल्यांवरुन शिवसेनेनं केंद्रात सत्तेत असणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील सरकावर टीका केलीय. काश्मिरी पंडितांवर हल्ले होत असून केंद्रात आणि जम्मू-काश्मीरमध्येही सत्ता असताना काश्मीर अशांत का असा प्रश्न शिवसेनेनं उपस्थित केलाय.

“जम्मू-कश्मीरसंदर्भात केंद्रातील सरकार अनेक दावे करीत असते. मात्र त्यांचे हे दावे आणि वादे फोल ठरविणारेच चित्र जम्मू-कश्मीरमध्ये दिसत आहे. दहशतवाद्यांकडून होत असलेले ‘टार्गेट किलिंग’ थांबविण्यात सरकारला यश आलेले नाही. मंगळवारीदेखील कुलगामच्या गोपाळपोरा येथील सरकारी शाळेत शिक्षिका असलेल्या रजनी बाला यांची दहशतवाद्यांनी निर्घृण हत्या केली. दहशतवादी शाळेत घुसले आणि अंदाधुंद गोळीबार केला. त्यात शाळेत येत असलेल्या रजनी बाला यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. खरे म्हणजे रजनी यांची बदली चवलगाम येथे झाली होती. त्या तेथे रुजू होणार होत्या. मात्र मंगळवार त्यांच्या आयुष्याचा शेवटचा दिवस ठरला. दहशतवाद्यांच्या गोळीबारात सुदैवाने आवारातील विद्यार्थी-विद्यार्थिनी बचावल्या. तथापि, दहशतवाद्यांचा हेतू आणखी एका निरपराध कश्मिरी पंडिताचा बळी घेणे हाच होता, हा या हल्ल्याचा दुसरा अर्थ आहे. ३७० कलम हटविल्यानंतर तरी जम्मू-कश्मीर शांत होईल, तेथील सामान्य जनता सुरक्षित जीवन जगेल अशी अपेक्षा होती. ज्यांनी हे कलम हटवले त्यांनीही तसेच दावे आणि वादे केले,” असं सामनाच्या अग्रलेखमध्ये म्हटलं आहे.

“जम्मू-कश्मीरमध्ये उद्योग उभे राहतील, व्यवसाय सुरू होतील, स्थानिक तरुणांना रोजगार मिळेल, प्रामुख्याने विस्थापित कश्मिरी पंडितांची ‘घरवापसी’ होऊन त्यांना त्या ठिकाणी सुरक्षित जीवन जगता येईल, जम्मू-कश्मीरमध्ये पुन्हा पूर्वीचे ‘नंदनवन’ अवतरेल असे एक चित्र उभे केले गेले. मागील दोन वर्षांत जम्मू-कश्मीरमधील परिस्थिती कशी सुरळीत होत आहे, दहशतवाद्यांचे कसे कंबरडे मोडले आहे, अशा वल्गना केल्या गेल्या. आपल्या लष्कराने या काळात अनेक दहशतवाद्यांना कंठस्नान घातले, दहशतवाद्यांच्या कारवायांना पायबंद घालण्याचा प्रयत्न केला. मे महिन्यात १५ चकमकींमध्ये २७ दहशतवाद्यांचा खात्मा केला हे खरेच, पण दुसऱ्या बाजूला दहशतवादी हल्ल्यांमध्ये जवान शहीद होतच आहेत. निरपराध नागरिकांचे बळी जातच आहेत. चारच दिवसांपूर्वी आमरिन भट या कश्मिरी पंडित अभिनेत्रीची गोळ्या घालून हत्या केली गेली. त्याआधी बडगाम जिल्हय़ात चडुरा तहसील कार्यालयात घुसून राहुल भट या कर्मचाऱ्याला गोळ्या घातल्या गेल्या,” असा उल्लेख या लेखात आहे.

“पुलवामामधील काकापोरा येथे आरपीएफचे दोन जवान, श्रीनगर येथील पोलीस शिपाई गुलाम हसन आणि सैफुल्ला कादरी या पोलिसाचे वडील मोहम्मद कादरी यांचीही अशीच निर्घृण हत्या करण्यात आली. आता रजनी बाला या पंडित शिक्षिकेलाही दहशतवाद्यांनी ठार केले. १९९० च्या दशकात कश्मिरी पंडितांच्या नशिबी आलेल्या विस्थापनाबद्दल, त्यांच्या शिरकाणाबद्दल काँग्रेस आणि इतर पक्षांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करणारेच मागील आठ वर्षांपासून केंद्रात सत्तेत आहेत. जम्मू-कश्मीरमध्येही राज्यपाल राजवट म्हणजे केंद्राचीच सत्ता आहे. मग तरीही जम्मू-कश्मीर अशांतच का आहे?,” असा प्रश्न शिवसेनेनं उपस्थित केला.

तसेच, “दहशतवाद्यांकडून होणारे ‘टार्गेट किलिंग’ थांबले का नाही? हिंदू, शीख, पंडित यांच्यासह स्थानिक मुस्लिमांच्या खुलेआम हत्या कशा सुरू आहेत? विद्यमान सरकारने दिलेल्या आश्वासनांचे बुडबुडे निरपराध्यांच्या रक्ताने लाल का होत आहेत? कालपर्यंत या प्रश्नांचा जाब तुम्ही मागील राज्यकर्त्यांना विचारीत होता. आज तुम्हालाही या प्रश्नांचा ‘जवाब’ द्यावाच लागेल. कारण तुमच्याही राजवटीत कश्मीरमधील हत्यासत्र सुरूच आहे आणि ‘‘सामूहिक स्थलांतर करू’’ असा अल्टिमेटम देण्याची वेळ कश्मिरी पंडितांवर आली आहे,” असं म्हणत शिवसेनेनं केंद्रातील मोदी सरकावर निशाणा साधलाय.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या