गंभीर आजाराने त्रस्त असतानाही लक्ष्मण जगताप करणार मतदान; रुग्णवाहिकेतून मुंबईसाठी रवाना


राज्यसभेच्या सहा जागांसाठी आज होणाऱ्या निवडणुकीत कमालीची चुरस निर्माण झाली आहे. सहाव्या जागेसाठी शिवसेना व भाजपमध्ये चुरशीची लढत आहे. मतदानासाठी सर्व पक्षांचे आमदार विधानभवनात दाखल झाले आहेत. यावेळी एकही आमदार बाहेर राहू नये किंवा मत वाया जाऊ नये यासाठी सर्व पक्ष प्रयत्न करत आहेत. यादरम्यान भाजपाचे एक आमदार चक्क रुग्णवाहिकेतून मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत.

पुण्यातील भाजपाचे आमदार लक्ष्मण जगताप गंभीर आजाराने त्रस्त असतानाही मतदान प्रक्रियेत सहभागी होणार आहेत. प्रकृतीच्या कारणास्तव लक्ष्मण जगताप मतदान प्रक्रियेत सहभागी होणार की नाही असा प्रश्न गेल्या काही दिवसांपासून होता. अखेर ते रुग्णवाहिकेतून मुंबईसाठी रवाना झाले आहेत.

गेल्या काही दिवसांपासून आजारी असलेले लक्ष्मण जगताप यांच्यावर पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. दीड महिन्यांच्या उपचारानंतर त्यांना २ जून रोजी डिस्चार्ज देण्यात आला होता. राज्यसभा निवडणुकीसाठी त्यांना एअर अँब्युलन्समधून नेणार असल्याची चर्चा होती. मात्र, डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर हा निर्णय बदलण्यात आला असून त्यांना रस्त्याने नेण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यांच्यासोबत त्यांचे बंधू शंकर जगताप आहेत.

“चंद्रकांत पाटील आणि फडणवीसांनी आम्हाला प्रकृती ठीक असेल तरच या असं सांगितलं होतं. आम्ही लक्ष्मण जगताप यांना निरोप दिल्यानंतर त्यांनी त्यांच्याशी संवाद साधत पक्षाला माझी गरज असून, मी प्रवास करु शकतो असं सांगितलं. तसंच निवडणुकीत सहभागी होण्याचा निर्णय घेतला,” अशी माहिती शंकर जगताप यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली. हवामान बदलामुळे डॉक्टरांनी एअर अँम्ब्युलन्सचा पर्याय नाकारला असंही त्यांनी सांगितलं.


खुल्या पद्धतीने मतदान

राज्यसभेसाठी खुल्या पद्धतीने मतदान होते. त्यानुसार राजकीय पक्षांच्या आमदारांना आपल्या पक्षाच्या प्रतोदाला दाखवून मतदान करावे लागते. आमदाराने पक्षादेश धुडकावल्यास त्या आमदाराच्या विरोधात पक्षाला पक्षांतरबंदी कायद्याखाली कारवाई करता येते. अपक्षांना मात्र मतपत्रिका दाखविण्याचे बंधन नसते. राज्यसभा निवडणुकीत आमदारांची मते बाद होण्याचे अनेक प्रकार घडले आहेत. हरयाणामध्ये काँग्रेसच्या १४ आमदारांनी निवडणूक आयोगाने दिलेल्या पेनाऐवजी वेगळय़ा शाईच्या पेनाचा वापर केल्याने ही मते बाद ठरली होती. गुजरातमध्ये काँग्रेसच्या दोन आमदारांनी मते भाजपच्या नेत्यांना दाखविल्याने ती मते बाद ठरली होती. या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्षांनी मतदान कसे करायचे याचे प्रशिक्षण आपापल्या आमदारांना दिले आहे.


उमेदवार : प्रफुल्ल पटेल (राष्ट्रवादी), संजय राऊत (शिवसेना), पीयूष गोयल (भाजप), इम्रान प्रतापगढी (काँग्रेस), अनिल बोंडे (भाजप), संजय पवार (शिवसेना), धनंजय महाडिक (भाजप)


आमदारांचे संख्याबळ

१०६ भाजप


५५ शिवसेना


५३ राष्ट्रवादी


४४ काँग्रेस


अपक्ष व छोटे पक्ष २९

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या