रशिया युक्रेन युद्धाचा परिणाम शालेय साहित्यवरही....

 वह्यांच्या किमती 20 ते 30 टक्क्यांनी वाढल्या



रशिया-युक्रेन युद्धाचा परिणाम, कागदाच्या किमती वाढणे, कोरोनाची परिस्थिती अशा विविध कारणांमुळे शालेय साहित्यापैकी एक असलेल्या वह्यांच्या किमती 20 ते 30 टक्क्यांनी वाढल्या आहेत.

त्यामुळे पालकांना जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. सीबीएससीची आणि बालभारतीच्या पुस्तकांच्या किमतीत वाढलेल्या नसल्याचे व्यावसायिकांनी सांगितले.


शालेय साहित्यांच्या खरेदीसाठी सध्या अप्पा बळवंत चौकासह विविध ठिकाणच्या दुकानांमध्ये गर्दी होत आहे. सध्या मुलांच्या शालेय वह्या आणि पुस्तकांच्या खरेदीसाठीही लगबग सुरू आहे. पुस्तकांच्या किमती न वाढल्यामुळे पालकांना थोडासा दिलासा मिळाला आहे. याविषयी अप्पा बळवंत चौकातील व्यावसायिक सचिन गायकवाड म्हणाले, 'आधी 20 रुपयांना मिळणारी वही 28 ते 30 रुपयांना मिळत असून, महागलेल्या वह्या विकत घेण्याशिवाय पालकांपुढे पर्याय राहिलेला नाही.'


संजीव मराठे म्हणाले, 'वह्यांची किंमत वाढली असली तरी पुस्तकांच्या किमती वाढलेल्या नाहीत. सीबीएससी आणि बालभारतीची पुस्तके आहे त्या किमतीत मिळत आहेत. पुस्तकांच्या किमतीत कोणताही परिणाम झालेला नाही.'


किशोर टिपणीस म्हणाले, 'कागदाच्या भाव वधारल्याने आणि कागदाची कमतरता यामुळे वह्यांच्या किमतीवरही परिणाम झाला आहे. त्याचा मागणी आणि पुरवठ्यावरही परिणाम झाला आहे.'


वह्यांच्या एका डझनामागे 25 ते 30 रुपये किमत वाढली आहे. 100 पानी छोटी वही 180 रुपये डझन, तर 200 पानी छोटी वही 250 रुपये डझन मिळत आहे. 100 पानी फुलस्केप वही 200 रुपये, तर 200 पानी फुलस्केप 400 रुपये डझन मिळत आहेत. पालकांना वह्यांच्या अधिकचा भुर्दंड सोसावा लागत आहे.


वह्यांच्या किमती 20 ते 30 टक्क्यांनी वाढल्या आहेत. काही वह्यांच्या कंपन्यांनी किमती वाढवलेल्या आहेत. पण, पालकांसमोर मुलांसाठी वही घेण्याशिवाय पर्याय नाही. मजबुरीमुळे ते वह्या विकत घेत आहेत. 

व्यावसायिक

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या