शाळेत गेल्या-गेल्या मुलांना अभ्यास आलाच पाहिजे ; वाचा काही टिप्स.......

 शाळेत गेल्या-गेल्या मुलांना अभ्यास आलाच पाहिजे, अशी घाई करू नका




पालकांनी मुलांच्या कलाने घ्यावे. शाळेत गेल्या-गेल्या मुलांना अभ्यास आलाच पाहिजे, अशी घाई करू नका. शाळेत पहिल्यांदाच पाऊल ठेवणाऱ्या मुलांवर अभ्यासाचा अतिरिक्त दबाव टाकल्यास अशा मुलांना शाळा, अभ्यास याबाबत भीती निर्माण होऊ शकते. त्याशिवाय ती नैराश्यात जाऊ शकतात. किंवा अगदी लहान वयात त्यांना आपण स्पर्धेत असून आपल्याला काय येते आणि काय येत नाही, याचीच चिंता सतावू लागेल. असे मत आरती पेंडसे, मानसतज्ज्ञ यांनी व्यक्त  केले.

विद्यार्थी हे पहिल्यांदाच शाळेत जात आहेत. शाळा सुरू होऊन अगदी आठवडा झाला आहे. त्यामुळे मुलांना अभ्यास काय शिकविला, त्यांना काय-काय अभ्यास येतोय, घरी काय अभ्यास करून घ्यायचा, हे विचारण्याची घाई पालकांना लागल्याचे दिसत असल्याने शिक्षकांना असंख्य प्रश्न विचारले जात आहेत. परंतु मुलांच्या वयाचा विचार करता, त्यांना त्याच्या गतीने आणि कलाने घडू देण्यासाठी पालकांनी थोडा संयम दाखवायला हवा. अभ्यासाची अति घाई करून नये आणि अभ्यासाविषयी अतिरेकी तगादा शिक्षकांकडे लावू नये, असा सल्ला शिक्षक, समुपदेशक पालकांना देत आहेत.

शाळा सुरू झाली की, आज काय शिकवले, काय गृहपाठ दिला हे, विचारण्याच्या मागे पालक लागतात. शाळा सुरू झाल्यावर मुलांना शाळेत रमविण्यासाठी शिक्षक प्रयत्न करतात. अभ्यासाची घाई पालकांनी सुरुवातीपासून करू नये. मुलांनी इतरांमध्ये मिसळणे, शिक्षकांशी जवळीक निर्माण करणे, शाळेची ओढ वाटणे, हे सगळ्यात महत्त्वाचे आहे. शिक्षक हे इयत्तानिहाय आखून दिलेल्या पद्धतीने मुलांना घडवीतात.

- कल्पना वाघ, मुख्याध्यापिका



पालकांसाठी टिप्स...


मुलांच्या शैक्षणिक, सामाजिक, भावनिक अशा सर्वांगीण विकासाबाबत संयम ठेवा


शाळेच्या सुरुवातीच्या काळात शाळेची ओढ मुलांना वाटू देत


वयानुसार त्यांना शाळेत शिकवलं जाणारच आहे, त्याची घाई नको


मुलांना त्यांच्या गतीने आणि कलेने घडायला पुरेसा वेळ द्या


अभ्यास, सगळ्या गोष्टी आल्याच पाहिजे, याचा अतिरेक आणि घाई टाळा


मुलांच्या मानसिकतेचा विचार करा


अभ्यासाचे ओझे लहान वयात वाटू देऊ नका


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या