पुणे रेल्वे स्थानकावर बॉम्बची पुन्हा अफवा

 

पुणे

पुणे रेल्वे स्थानक बॉम्बने उडवून देतो,' असा कॉल पोलिस कंट्रोल रूमला बुधवारी सकाळी 11 च्या सुमारास आला आणि स्थानकावर यंत्रणांची धावपळ उडाली. सर्व यंत्रणांनी दिवसभर या ठिकाणी येऊन कडक तपासणी केली.

पुणे रेल्वे स्थानकावर बॉम्बची पुन्हा अफवा उठल्यामुळे परिसरात खळबळ उडाली. यापूर्वी एकदा असाच एक फेक कॉल पोलिस प्रशासनाला आला होता. त्यानंतर येथे मागील महिन्यातच फटाक्यासारखी दिसणारी वस्तू आढळून आली आणि बुधवारी पुन्हा कंट्रोल रूमला असाच एक फेक कॉल आला. मात्र, याकडे दुर्लक्ष न करता सर्व यंत्रणांनी येथे येऊन स्वत: तपासणी केली. या वेळी बॉम्बशोधक पथकाने, डॉग स्क्वॉड, पुणे शहर पोलिस, लोहमार्ग पोलिस, आरपीएफसह रेल्वेचे अधिकारी, कर्मचार्‍यांनी परिसराची पाहणी केली.


लोहमार्ग पोलिस अधीक्षक सदानंद वायसे पाटील यांनी सांगितले की, पुणे पोलिस नियंत्रण कक्षाला सकाळी 11 वाजून 55 मिनिटांनी फोन आला. त्यात पुणे रेल्वे स्थानक उडवून देणार असल्याची धमकी देण्यात आली. पुणे पोलिसांनी ही माहिती रेल्वे पोलिसांना कळविली. ताबडतोब रेल्वे पोलिसांनी सर्व रेल्वे प्लॅटफॉर्मवर सर्व सामानाची, मालधक्का, रेल्वेगाड्यांची बॉम्बशोधक व नाशक पथकामार्फत तपासणी केली. हा फोन विशाखापट्टण येथील मोबाईल असलेल्या तरुणाने मुंबईतून केल्याचे निष्पन्न झाले आहे. मुंबई पोलिसांच्या मदतीने या तरुणाची ओळख पटली असून, त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. त्याला पुण्यात आणण्यात आणल्यानंतर त्याच्या चौकशीतून नेमका प्रकार समोर येऊ शकेल.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या